मुळशी: सर्वसामान्य जनतेचा मी कार्यकर्ता असून, तळागाळातील लोकांपर्यंत माझा संपर्क आहे. गेल्या १५ वर्षांपासून तालुक्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे येथे रोजागार, शिक्षण आणि मूलभूत सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. या मूलभूत सुविधांसाठी विशेष प्रयत्न करणार असून, संधी मिळाल्यास या समस्या प्राधान्याने सोडविणार असल्याचे आश्वासन युतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी दिले. तसेच गावकऱ्यांना या मूलभूत सुविधा मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मतदारसंघाला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी तुम्ही साथ देल्यास शक्य होणार असल्याचा विश्वास मांडेकर यांनी यावेळी व्यक्त केला. विद्यमान आमदारांचा सर्वसामान्यांशी संपर्क नसल्याची टीका देखील मांडेकर यांनी यावेळी बोलताना केली. ते आंधळे गाव येथे आयोजित केलेल्या ‘भेटी -गाठी आपल्या माणसांच्या’ या दौऱ्यात बोलत होते.
तालुक्यातील आंधळे, कातरखडक, खांबोली, पिंपळोली, जवळगाव केमशेवाडी, पडळघर वाडी, रिहे, घोटावडे, मुलखेड, नांदे, लवळे, सुस, म्हाळुंगे या गावांना मांडेकर यांनी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी व स्थानिक कार्यकर्त्यांनी मांडेकर यांचे जल्लोषात स्वागत केले. गाव भेटी दरम्यान गावकऱ्यांनी मांडेकर यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच तालुक्यातील रखडलेली विकासाची कामे ही मांडेकर यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण होतील, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. “बच्चा बच्चा जानता है शंकर भाऊ सच्चा है” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. येथील महिलांनी मांडेकर यांचे औक्षण करून स्वागत केले.