भोर –शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी आयोजित केली जाणारी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांची पदयात्रा अर्थातच धारातीर्थ गडकोट मोहिम यावर्षी शुक्रवार दि.७ ते मंगळवार दि.११ फेब्रुवारी दरम्यान होत असून या मोहिमेत भोर तालुक्यातील ३५० धारकरी सहभागी होणार आहेत.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची ही ३९ वी मोहिम असून दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात ही मोहीम आयोजित केली जाते. यावर्षी नरवीर तानाजी मालुसरे यांचे पोलादपूरमधील जन्मगाव उमरठ ते स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड असा या मोहिमेचा मार्ग असणार आहे. या दरम्यान पुण्यातील हिंदवी स्वराज्य भूमी असलेल्या भोर तालुक्यातून ३५० धारकरी या गडकोट मोहिमेला शुक्रवारी (ता.७) मार्गस्थ होणार आहेत. भोर शहरातील शिवतीर्थ चौपाटी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीस पुष्पहार अर्पण करून भोर वरंधाघाट मार्गे या मोहिमेस सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे भोर तालुका प्रमुख धनंजय पवार यांनी दिली.