धर्मप्रेमींनी घेतला धर्मासाठी कृतिशील होण्याचा निर्धार
पुणे : – छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी स्वराज्या’चा अभिमान असलेला सिंहगड किल्ला यंदा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दिवस शिवरायांच्या सानिध्यात’ या मोहिमेने जागरूकतेचा केंद्रबिंदू ठरला. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा वारसा जपण्यासाठी आणि गड-दुर्गांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने रविवार (दि.२४) सुट्टीचा दिवस वाया न घालवता या मोहिमे उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्तांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
मोहिमेची सुरुवात आदिशक्ती भवानी मातेच्या चरणी आणि श्री कोंढाणेश्वर व श्री अमृतेश्वर यांच्या चरणी सामूहिक प्रार्थनेने झाली. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून उपस्थित धर्मप्रेमीं शिवभक्तांना श्रीकांत बोराटे आणि दिपक आगावणे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी सर्व धर्मप्रेमींनी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ नामजप करून रामराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. तानाजी कडा, बुलंद दरवाजा, तानाजी मालुसरे समाधी, कोंढाणेश्वर मंदिर यांसारख्या ऐतिहासिक स्थळांची माहिती देत, शिवराय व मावळ्यांच्या अध्यात्मिक बळावर आधारलेल्या धर्मकार्याचा अभ्यास करण्यात आला.मावळ्यांच्या शौर्यकौशल्यांचा अनुभव देत, तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी यांसारखी स्वसंरक्षण कौशल्ये सादर करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील आळंदेवाडी, गोकवडी तसेच वाघळवाडी, नवलेवाडी, तळेगाव व इतर भागांतून १७० हुन अधिक धर्मप्रेमी शिवभक्तांनी या मोहिमेत सहभाग घेतला. गडावरील पर्यटक आणि व्यवसायिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.गडकोट किल्ले संवर्धन आणि राष्ट्रधर्म रक्षणासाठी समाजाने एकत्र येऊन प्रेरणा घेण्याचा निर्धार या मोहिमेद्वारे दृढ करण्यात आला.