पर्यावरणाचा समतोल व संवर्धन करण्यासाठी पाचगणीत शाडू मातीपासून गणेश मूर्ती कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली आहे.पाचगणी येथील नगरपालिकेच्या घाटजाई विद्यामंदिरात शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाणीपुरवठा अभियंता दिग्विजय गाढवे, स्वच्छता निरीक्षक गणेश कासुर्डे, आरोग्य विभाग प्रमुख सुरेश मडके, समन्वयक ओमकार ढोले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी केंद्र प्रमुख दिपक चिकणे म्हणाले कि, शाडू मातीपासून मूर्ती कशी तयार करावी हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखविले. तसेच या कालावधीत मोठय़ा प्रमाणात ध्वनी व जलप्रदूषण होत असल्याने हा उत्सव पर्यावरणपूरक म्हणून साजरा करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. तर मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शाडू मातीचे महत्त्व पटवून दिले त्याचबरोबर प्लास्टर ऑफ पॅरिसपासून प्रदूषण कसे होते हेही पटवून दिले.