भोर : भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा महत्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन हा एका दिवसावर येऊन ठेपला असुन राख्यांचे दर महागल्याने भोरच्या बाजारपेठेत राख्या खरेदीसाठी तुरळकच गर्दी दिसून येत आहे.
श्रावण महिन्यातल्या सोमवारी १९ तारखेला उद्या भाऊ बहिणीचे पवित्र नाते अखंड टिकुन ठेवणारा रक्षाबंधन हा सण आला आहे. दोन दिवसांपासून बॅंकेत लाडक्या बहिणींची मोठी गर्दी पहायला मिळाली .आजचा रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने सकाळपासूनच बाजारात राखी खरेदीसाठी महिलांची गर्दी पहायला मिळाली. शेतातील भात लावणीची, पेरणीची ,बेणनी, खुरपणी ही कामे सुरू आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून राख्या खरेदीसाठी म्हणावी अशी गर्दी दिसून येत नाही. बाजारपेठेत ठिक ठिकाणी राख्यांचे स्टाॅल लागले आहेत. यावेळीही नवनवीन डिझाइनच्या रंगीबेरंगी, फुलांच्या, गोंड्याच्या,चकमकी, रूद्राक्ष, लहान मुलांसाठी आकर्षक छोटाभीम ,मोटूपतलू, स्पायडर मॅन डिजिटल, इलेक्ट्रॉनिक, लाईट तसेच खड्यांची राखी असलेल्या राख्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
तसेच दरवर्षी प्रमाणे यंदाही राख्यांचे दर वाढल्याने व महागाई फटका राखी व्यवसायाला बसत असल्याने ग्राहक मागेल त्या किंमतीत तडजोड करून आर्थिक तोटा सहन करून राखी विक्री करत असल्याचे बाजारपेठेतील व्यापारी रोहित कोठावळे , प्रशांत पवार, सुरेश तुपे व समीर आतार यांनी सांगितले.
जुनी भरजरी, चकमकी स्पंची कापसाची राखी मात्र यावर्षी कुठे दुकानात जास्त प्रमाणात पाहायला मिळाली नाही. दोन दिवस झाले सरकारच्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे खात्यावर जमा होत असल्याने महिला वर्गात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे यावर्षीचा रक्षाबंधन सण गोड होणार आहे असे महिलांकडून सांगण्यात आले.