भोरः भोर शहर तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून, येथील दुर्गम भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरापासून महाड, आंबवडे खोऱ्यातील अनेक गावांकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पावसाळ्यानंतर भोर तालुक्यातील नागरिक व आजूबाजूच्या परिसरातील नागरिक रायरेश्वर, केंजळगड, आंबवडे आणि सभोवतालचे निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी जात असतात. राज्यातील अनेक हौसी पर्यटक या भागांमध्ये मोठ्या संख्येने येत आहेत. भोरपासून आंबेघरपर्यंतचा रस्ता सुस्थितीमध्ये असल्याने वाहनकालकांचा प्रवास सुसाट होतो.
आंबेघर गावाजवळील उतारावर रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे वाहनचालकांच्या वाहने चालविताना अचानक नजरेस येतात, अशावेळी गाडीचा वेग अधिक असल्याने वाहनचालकांना वेग नियंत्रित करणे अवघड होते. त्यामुळे अनेक वेळा या खड्यांमध्ये दुचाकीस्वार पडल्या असल्याचे देखील घटना घडलेल्या आहेत.
त्यामुळे मनुष्यहानी होण्याअगोदरच प्रशासनाने या मार्गावर पडलेले खड्डे तातडीने बुजविणे गरजेचे आहे. आंबेघर ते चिखलावडे आणि आंबवडे ते म्हाकोशी दरम्यान काही ठिकाणी तर संपूर्ण रस्ताच खराब झाल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. त्यामुळे या रस्त्यावर पडलेले खड्डे व काही ठिकाणी रस्त्यांची झालेली दुरावस्था तातडीने दुरुस्त करण्यात यावी, ही मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे.