भोर: तालुक्यातील पळसोशी गावचे पोलीस पाटील मंगल नामदेव म्हस्के यांनी २०१० मध्ये झालेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेत अर्ज केला होता. त्यावेळेस शैक्षणिक अर्हता अट दहावी पासची होती. त्यावेळेस त्यांनी अर्जासोबत रयत शिक्षण संस्था आदर्श विद्यालय शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा या शाळेतून शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जोडले होते. मात्र, या दाखल्यामध्ये अक्षरांमध्ये वेगळेपण व तफावत असल्याचे तसेच भरती प्रक्रियेत सदर दाखला शासनाकडून सत्यता पडताळणी झाली नसल्याने संबंधित विभागाची कामात कुचराई झाल्याचे दिसून येते. असे गावचे विनायक म्हस्के यांनी निदर्शनास आणून दिले. माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल केल्यानंतर शाळेतील दिलेला दाखला व भरती वेळी जोडलेला दाखला वेगवेगळा असल्याची माहिती त्यांना शाळेकडून मिळाली. यामुळे बोगस दाखल्यावर उपविभागीय अधिकारी कोणता निर्णय घेणार असा प्रश्न उपस्थित झाल्याचे म्हस्के यांनी सांगितले.
सदर प्रमाणपत्र दाखल्यावर पडताळणी केल्यानंतर शाळेने दिलेल्या माहितीनुसार मोठी तफावत आढळून आली. त्यांनी जोडलेल्या दाखल्यावर शेवटच्या माहितीमध्ये कोणत्या इयत्तेत शिकत होता, कधीपासून (साल वर्षे) अक्षरी अंकी व शाळा सोडल्याचे कारण या समोरील अक्षरांमध्ये वेगळेपण तफावत व त्यासमोरचा मजकूर चिकटवलेला आहे. नंतर त्याची छायांकित प्रत काढून ती सत्यप्रत करून ती भरती समयी जोडली गेली आहे असे सांगितले आहे.
१४ वर्ष शासनाची फसवणूक?
शाळेने दिलेल्या माहितीनुसार, सदर विद्यार्थीनी इयत्ता आठवीमध्ये शिकत असताना १९९२ मध्ये सतत गैरहजर असल्याने शाळेच्या रेकॉर्डवरून सदर नाव कमी केले असल्याचे सांगण्यात आले आहे. यावरून सदरचा दाखला फक्त भरती प्रक्रियेकरिता बोगस केला असावा व या दहावी पासच्या अटीवर सदर गावचे महिला पोलीस पाटील भरती झाले आहे असे दिसून आले आहे. म्हणजेच गेली १४ वर्षे शासनाची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. भरती प्रक्रियेत सदर दाखला शासनाकडून सत्यता पडताळणी झाली नसल्याने संबंधित विभागाची कामात कुचराई झाल्याचे दिसून येते. असे गावचे विनायक म्हस्के यांचे म्हणणे आहे. शाळेतील दिलेला दाखला व भरती वेळी जोडलेला दाखला वेगवेगळा आहे. सदर बोगस दाखल्यावर उपविभागीय अधिकारी कोणता निर्णय देणार? शासनाची फसवणूक जाणून बुजून केली आहे काय? एवढी वर्षे घेतलेले मानधनास कोण जबाबदार ? असे अनेक प्रश्न उपस्थित झाल्याचे मस्के यांनी सांगितले.
पळसोशी (ता.भोर)गावच्या पोलीस पाटील यांचा पोलिस पाटील भरती प्रक्रियेत जोडलेला शाळा सोडल्याचा दाखला बोगस, खोटा असून संबंधितांवर योग्य ती कारवाई प्रशासनाने करावी
विनायक म्हस्के – पळसोशी (ता.भोर)
सदर प्रकरणाची माहिती घेऊन या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.
– डॉ विकास खरात, प्रांत अधिकारी