भोर: मंगळवार (दि.२७) पासून गोविंदांकडून दहीहंडीसाठी शहरातील दररोज एक रस्ता बंद केला जात आहे. यामुळे भोरवासीयांचे तर हाल होतात, शिवाय डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना त्रास होत आहे. गेल्या चार दिवसांपासून सायंकाळी शहरातील एका मंडळाची दहीहंडी सुरु आहे. त्यासाठी दहीहंडी असलेला रस्ता हा डीजेच्या स्पीकरच्या भिंती उभारून पूर्णपणे बंद केला जात आहे. रस्ता बंद असल्याच्या कोणत्याही सूचना, बोर्ड किंवा बॅरॅकेट लावली जात नाही. त्यामुळे संबंधित रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून, वाहनचालकांसोबत नागरिकांनाही मनस्ताप होत आहे.
रुग्णवाहिका किंवा खासगी वाहनाने जाणाऱ्या रुग्णांचा प्रवास हा जीवघेणा ठरत आहे. मंगळवारी शहरातील मुख्य मंगळवार पेठेतील रस्ता बंद करण्यात आला होता. बुधवारी चौपाटीवरील, गुरुवारी एसटी स्टँडवरील पूलावरचा रस्ता आणि शुक्रवारी नगरपालिकेशेजारील रस्ता बंद करण्यात आला. रस्ता बंद करण्यासाठी नगरपालिकेने अथवा पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. पोलिसांनी फक्त रात्री दहा पूर्वी स्पीकर वाजविण्यासाठी परवानगी दिलेली आहे. मात्र, नगरपालिकेकडून कोणालाही कुठल्याही प्रकारची परवानगी दिलेली नसल्याचे मुख्याधिकारी श्रीराम पवार यांनी सांगितले. पोलिसांनी स्पीकरची परवानगी दिलेली आहे, मात्र प्रत्यक्षात कर्णकर्कश आवाजात डीजे आणि लेझर लाईट सुरु असते. एकतर शहरातील प्रत्येक रस्त्यांवर अतिक्रमण झालेले आहे. तसेच रस्त्याच्याकडेला वाहने उभी केली जात आहेत. उर्वरित निम्या रस्त्यावर नेहमी ट्रॅफिक असते आणि आता तर पूर्ण रस्ताच बंद केला जात आहे. त्यामुळे भोरवासींना त्रास देण्यासाठी पोलीस आणि नगरपालिका प्रशासन खतपाणी घालत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.