भोर: पुणे महानगरपालिका माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी राजगड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षकांना अर्ज सादर करत, काँग्रेसच्या कार्यकर्ता विरोधात दाखल झालेल्या १३० कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.
दगडे पाटील यांनी निवेदनात स्पष्ट केले की, भोरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांच्या सहकाऱ्याने काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या विषयी चुकीचे वक्तव्य केले होते. या वक्तव्याला त्यांनी तत्काळ विरोध करून त्या व्यक्तीकडून माफी मागवून घेतली. कार्यक्रमात हा प्रकार घडल्याने त्यांनी स्वत: देखील दिलगिरी व्यक्त केली. मात्र, काही नेते मंडळींनी तरुण कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करून आंदोलन छेडले, ज्यामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का लागला.
पुढे निवेदनात म्हंटले आहे की ,तरुण कार्यकर्त्यांना भडकावून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले असून, वास्तविक दोष अन्य मंडळींचा आहे. या तरुण कार्यकर्त्यांवर होणाऱ्या कारवाईमुळे त्यांच्या भविष्यातील जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यांच्या मते, अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांचे जीवन उद्ध्वस्त होणार नाही.
राजगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक यावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.
काय आहे प्रकरण
काही दिवसापूर्वी माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर करण्यात आलेल्या वक्तव्यावर काँगेस कार्यकर्त्यांकडून कापूरहोळ या ठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनात राजगड पोलिस स्टेशन यांच्याकडून 130 ते 150 कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.