वेल्हा: वेल्हा तालुक्यातील युवक कॉंग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यावर शाई फेकली व तीव्र नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी अभियंत्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी देऊन शासकीय काम करण्यापासून परावृत्त केल्या प्रकरणी वेल्हे पोलिसांत फिर्याद दिली असून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साईप्रसाद दिनेशराव मनगीलवार (वय.३४) कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग वेल्हे ,सध्या राहणार आंबेगाव बुद्रुक पुणे ,मूळ गाव देगलूर जिल्हा नांदेड असे अभियंत्याचे नाव असून ही घटना सोमवार(ता.०५) रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाचे वेल्हे कार्यालय याठिकाणी घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (ता.26 )जुलै रोजी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आमदार संग्राम थोपटे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये तालुक्यातील नागरिकांनी दुर्गम भागातील केळद, पासली, वरोती इतर अठरा गाव मावळ परिसरातील नागरिकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला. यावेळी संग्राम थोपटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना रस्ता दुरुस्ती करण्याच्या तात्काळ सूचना देण्यात आल्या होत्या मात्र दहा दिवस उलटूनही याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी कनिष्ठ अभियंता साई प्रसाद मनगिलवार यांच्यावर शाई फेकून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
घटना घडल्यानंतर अभियंत्याने वेल्हे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली या तक्रारीमध्ये डोक्यावर व चेहऱ्यावर तसेच अंगावर पूर्ण शाई टाकली असून कार्यकर्त्यांनी मोठ्या मोठ्याने शिवीगाळ करून मारण्याची धमकी देऊन शासकीय काम करण्यापासून परावृत्त केल्या प्रकरणी फिर्याद दिली आहे याप्रकरणी वेल्हे पोलिसांनी महेश जाधव पूर्ण नाव माहीत नाही राहणार कोलंबी (ता. वेल्हे, राजगड) व काँग्रेस तालुका युवक अध्यक्ष शिवराज शेंडकर व इतर दहा ते बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेल्हा पोलिस करीत आहेत.