खेड शिवापूरः येथील टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी गुहागरहून स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या एसटीच्या चालक व वाहकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जवळपास १५ जणांच्या टोळक्याने एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली आहे. ट्रकने एसटी बसला एका बाजूला दाब दिल्याने याचा जाब विचारायला गेलेल्या चालकास या टोल नाक्यावरील व्यक्तीने सर्वप्रथम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच बसेच्या वाहकाला देखील या टोळक्याने मारहाण करुन शिव्या देत धमकी दिल्याचे या बसचे वाहक प्रवीण भगवान नांगरे यांनी सांगितले.
मुलगी रडली नसती तर त्यांनी जीवच घेतला असता
यात कमी काय म्हणून या टोळक्याने बसेसमध्ये येत वाहकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बसमध्ये असलेल्या प्रवाशांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र ते ऐकत नव्हते. अचानक यावेळी एक लहान मुलगी जोरजोराने रडू लागल्याने हे सर्वजण तिथून निघून गेल्याचे या बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेने सांगितले. मुलगी रडली नसती तर त्यांनी वाहकाचा जीवच घेतला असता, असे देखील या महिलेने सांगितले. शिवापूर चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी या बसचे वाहक व चालक गेले असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.