भोर/खंडाळा : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील वडगाव डाळ (ता. भोर) व राजेवाडी (ता. खंडाळा) या दोन गावांना जोडणारा शिवरस्ता तब्बल १४ वर्षे वादात अडकून होता. अखेर तहसिलदारांच्या मध्यस्थीने व ग्रामस्थांच्या सामोपचाराने हा वाद मिटवून मंगळवारी पर्यायी रस्ता ग्रामस्थांसाठी खुला करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांच्या पिढ्यान्पिढ्या सुरू असलेल्या मोठ्या समस्येचा शेवट झाला असून समाधानाचा श्वास गावकऱ्यांनी सोडला आहे.
या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या समोर सुनावणी सुरू होती. वादी-प्रतिवादी यांच्यातील चर्चेनंतर अलका मदन दिवाण यांनी स्वःताच्या गट नंबर ४४ मधील जमिनीतून १५ फूटाचा रस्ता देण्याचे मान्य केले. परिणामी ग्रामस्थांनीही हा पर्यायी मार्ग मंजूर केला. या निर्णयाला दोन्ही तालुक्यांच्या तहसीलदारांनी न्यायालयीन आदेशात मान्यता देऊन प्रत्यक्षात रस्ता खुला करून दिला.
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली भोरचे तहसिलदार राजेंद्र नजन, खंडाळ्याचे तहसिलदार अजित पाटील, नायब तहसिलदार वृषाली घोरपडे, मंडलाधिकारी चंद्रशेखर जगताप, अँड. विजय मुकादम, अँड. ञिंबकराव देशमुख, माजी सभापती राजू तांबे, राजगड कारखान्याचे संचालक सुधीर खोपडे यांच्यासह सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रस्ता खुला झाल्यामुळे शेतात जाण्यासाठीचा मोठा अडथळा दूर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याबाबत तहसिलदार राजेंद्र नजन म्हणाले, “गावच्या विकासासाठी वाद विवाद नको. वडगाव-राजेवाडी शिवरस्त्याने त्याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.” तर तहसिलदार अजित पाटील यांनी “अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न सुटल्याचा आनंद” व्यक्त केला.
या सोहळ्याचे प्रास्ताविक किशोर बरकाले यांनी केले, सूत्रसंचालन सुधीर खोपडे यांनी तर आभार सचिन खोपडे यांनी मानले.