भोर पासून दोन कि मी अंतरावर पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या भाटघर धरण बॅक वॉटर म्हणजेच बसरापूर गावच्या वेळवंडी नदी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात शनिवार व रविवार या सुट्टींच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होत असून मच्छीमारांची देखील या दिवशी नदीकिनारी लांबच लांब रांगच लागताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसापासून बसरापुर नदीकिनारी चिलापी मत्स्यपालन प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारलेले आहेत. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात चिलापी मच्छीपालनाची बीजे नदीत या प्रकल्पातून सोडली जात आहेत , त्यामुळे या नदीकिनारी चिलापी या माशांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली आहे. मच्छीमार करणाऱ्यांना नदी काठावरच मोठ्या प्रमाणात चिलापी हे मासे मिळत असल्याने नदीघाटावर पर्यटकांबरोबर मच्छीमार करणाऱ्या नागरिकांची देखील मोठी झुंबड उडाली आहे. नदीकिनारी भात खाचराच्या तालींच्या उंचवट्यावर उभे राहून लंबदोर ,छडी (स्टीक ) खाद्य टाकून हे मच्छीमार मासेमारी करताना दिसत आहेत. या मच्छीमारांकडे मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना नसल्याने हि मच्छीमारी करताना धोकादायक असल्याचे दिसत आहे .रात्रीच्या एका वेळच्या कालवणाची सोय करत आहोत असे येथील मच्छीमार करणाऱ्या नागरिकांकडून सांगण्यात आले.