रस्ता काम सुरू असताना वाहतूकीमुळे होत आहे मोठा अडथळा; सुरक्षिततेसाठी उपाययोजना
भोर -मांढरदेवी रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट रस्ता करण्याचे काम सुरू असून ये -जा करणा-या वाहनांच्या वाहतुकीमुळे या कामाला मोठा अडथळा निर्माण होत असल्याने भोरचे उपविभागीय अधिकारी,कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग, पोलीस प्रशासन , महसूल विभाग यांच्या अहवाल मागणीनुसार कापूरव्होळ – भोर -मांढरदेवी रस्ता यात्रेकरूंसाठी १९ डिसेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आला आहे. पर्यायी रस्त्याने वाहतूक वळविण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पुण्याहून व इतर ठिकाणांहून श्री क्षेत्र मांढरदेवीला जाणारी वाहतूक भोरला न जाता पुणे सातारा महामार्गाद्वारे सुरुर फाट्यापासुन वाईमार्गे मांढरदेवकडे वळविण्यात आली आहे. काळेश्वरी देवीची यात्रा १२ जानेवारी पासून २९ जानेवारी या कालावधीत संपन्न होणार आहे. मांढरदेवी यात्रेसाठी राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त काळेश्वरी देवीचे दर्शनासाठी येत असतात. सदर यात्रा कालावधीमधील काळेश्वरी देवीचे दर्शनासाठी भोर, आंबाडेमार्गे आंबाडखींड घाटातून काळेश्वरी देवीला जाणा-या भाविकांची संख्या हि मोठ्या प्रमाणावर असते. सद्यस्थितीमध्ये भोर ते मांढरदेवी रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंटरस्ता कॉंक्रीटीकरण तयार करणेचे काम सरु असून सदर रस्त्याचा बहुतांश भाग हा नादुरुस्त स्वरुपाचा तसेच घाट रस्त्यामध्ये अद्याप ब-याच ठिकाणी सुरक्षा कठडे नसलेचे व नादुरुत्त स्वरुपात असून सुरक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण उपाय योजना पूर्ण झालेल्या नाहीत. रस्त्यावर वाहनांची वाहतूक वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते.
आंबाडखिंड घाट मांढरदेवी प्रारंभ पर्यंत सिंगल रोड अरुंद रस्ता आहे. घाट प्रारंभ ते घाटमध्य भागापर्यंत रोडचे काम केलेले नाही. त्यामुळे सदरचा रस्ता हा घाटाच्या मध्यभागी नादुरुस्त व अरुंद असून नवीन रोडचे काम सुरु आहे. त्याठिकाणी एकेरी रोडची वाहतुक सुरु आहे. भोरचे प्रांताधिकारी डॉ.विकास खरात , तहसीलदार राजेंद्र नजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राजसाहेब आगळे व पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार यांनी संयुक्तपणे सदर रस्ता पाहणी केली .या कालावधीत रस्ता पुर्ण करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले आहेत .या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होऊ शकते तसेच त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे सरंक्षक कठडे नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या काळात येणाऱ्या भाविकांनी भोरला न जाता पर्यायी पुणे सातारा महामार्गावरील सुरूर फाट्यावरून वाईमार्गे मांढरदेवला जावे सुरक्षिततेसाठी व अपघात टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सदरचा रस्ता बंद करण्यात आला आहे असे भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ विकास खरात यांनी सांगितले.