शेतकऱ्यांनी संभ्रमात राहु नये ; एमआयडीसीचे काम अंतिम टप्प्यात
भोर : तालुक्यातील उत्रौली येथे एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) प्रकल्प होणार नाही, भोरचे औद्योगिक क्षेत्र वगळण्यात आले आहे, अशा चुकीच्या बातम्या पसरविल्या जात आहेत. या गैरसमजातून तालुक्यात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत भोर तालुक्यात एमआयडीसी प्रकल्प होणारच, असे जि प माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी स्पष्ट केले.
शिवतरे यांनी पत्रकार परिषद घेत तालुक्यात एमआयडीसी प्रकल्पाबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, औद्योगिकीकरणामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे हा प्रकल्प भोर तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. काही अपप्रचारक या प्रकल्पाविरोधात चुकीची माहिती पसरवत असून नागरिकांनी त्याला बळी पडू नये. शासनाच्या पातळीवर हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून लवकरच अधिकृत घोषणा होईल. शेतकऱ्यांनाही चांगला मोबदला यातून मिळणार आहे, शेतक-यांनी कोणत्याही संभ्रमात राहु नये असे त्यांनी स्पष्ट केले.
भोर तालुका औद्योगिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा भाग आहे. येथील भौगोलिक परिस्थिती आणि पुणे-मुंबईसारख्या महानगरांशी असलेली जवळीक ही उद्योगांसाठी फायदेशीर ठरणार आहे. स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळावा, यासाठीच हा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे भोर तालुक्याच्या पर्यटन क्षेत्रालादेखील चालना मिळणार आहे.
शिवतरे यांनी तालुक्यातील जनतेला आश्वस्त करत सांगितले की, एमआयडीसीच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे कोणीही चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. शासन व संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून हा प्रकल्प भोरमध्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
एमआयडीसीमुळे विकासाची नवी दारं उघडणार
भोर तालुक्यातील युवकांना आपल्या गावातच उद्योग व व्यवसायाच्या संधी मिळाव्यात, तालुक्यातील बेरोजगारी कमी व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रयत्नातून एमआयडीसी प्रकल्प राबवण्याचा मी निर्धार केला आहे. यासाठी लवकरच या संदर्भात अधिकृत निर्णय जाहीर केला जाईल. त्यामुळे नागरिकांनी चुकीच्या प्रचाराला बळी न पडता विकासाच्या दिशेने एकत्र यावे, असे आवाहन रणजित शिवतरे यांनी केले. यावेळी माजी आदर्श जि.प.सदस्य चंद्रकांत बाठे उपस्थित होते.