भोरः राज्य परिवहन महामंडळाच्या भोर बस स्थानकामध्ये नवीन इमारत बांधकामाकरीता जिल्हा वार्षिक नियोजन समिती आराखडा 2023-24 मधून जिल्हा स्तर नगरोत्थान योजने अंतर्गत 1 कोटी 39 लक्ष निधी मंजूर असून, अर्थसंकल्पामधून बस स्थानक, वाहन तळाचे (परिसर) कॉक्रीटीकरणासाठी 4 कोटी 13 लक्ष इतका निधी मंजूर झाला असल्याची माहिती भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.
या कामांसाठी आमदार संग्राम थोपटे यांनी विशेष प्रयत्न केले असल्याचे यावेळी सांगितले. जिल्हास्तर नगरोत्थान योजनेअंतर्गत भोर बस स्थानकासाठी मंजूर झालेल्या निधीमधून जुन्या इमारतीच्या जागेवर सुसज्ज अशी नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. तसेच सदर जुन्या इमारतीच्या पाडकामाकरिता राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालय, पुणे यांच्यामार्फत निवीदा प्रक्रिया तयार करण्यात आलेली आहे. भोर बस स्थानकातील नविन इमारतीच्या बांधकामाकरीता भोर नगरपालिकेमार्फत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून सदरचे काम लवकरच सुरु होणार आहे.
त्याचप्रमाणे भोर बस स्थानकातील वाहनतळाच्या कॉक्रीटीकरणाकरीता अर्थसंकल्पामधून 4 कोटी 13 लाख रुपयांचा निधी मंजूर असून यामध्ये बस स्थानकातील वाहन तळाचे (परिसराचे) कॉक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचे थोपटे यांनी सांगितले. सदर कामाची निवीदा प्रक्रिया पूर्ण झालेली असून, संबंधित ठेकेदारास काम सुरु करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. सदरचे काम पाऊस उघडल्यानंतर त्वरीत सुरु करण्यात येणार असल्याचे यावेळी आमदार संग्रामदादा थोपटे यांनी सांगितले. यामुळे मंजूर कामांमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.
दूर्गम व डोंगरी असलेल्या मतदार संघाचा विकास घडवून आणण्यासाठी विविध प्रकारचे निधी उपलब्ध करुन अनेक कामे मार्गी लावली जातील व त्यातून मतदार संघातील जनतेच्या समस्या दूर होण्यास मदत होईल. नाबार्ड, केंद्रिय मार्ग, राज्य मार्ग, आमदार स्थानिक निधी, डोंगरी विकास निधी, दलित वस्ती, राष्ट्रीय पेयजल योजना व जिल्हा नियोजन अंतर्गत रस्ते व साकव अशा विविध योजना व निधींच्या माध्यमातून मतदार संघात विविध प्रकारची विकास कामे केली जाणार आहेत.
-आमदार संग्राम थोपटे