भोर शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत रावळ चौकात एका व्यावसायिक तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना आज शुक्रवार ( दि१९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
आज बेंदूर बैलपोळा हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असल्याने ग्रामीण भागातून तसेच शहरातून खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अशातच गजबजलेल्या गर्दीच्या वेळेस एका अज्ञात तरुणाने व्यावसायिकदार सचिन मांढरे (अंदाजे वय ४२ वर्षे) या तरुणावर कोयत्याने मानेवर वार करत पसार झाला. हल्लेखोरास पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो पळून गेला. त्यामुळे बाजारपेठेत एकच खळबळ उडाली. जखमी झालेल्या तरुणास तातडीने शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत.प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोर हा भोर शहरातीलच असून नशाबाजी करणारा तरुण असल्याचे समजले आहे. भोर शहरात कोयत्याने हल्ला झाल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.