भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा ग्रामीण व दौंड तालुका कृषी उत्पादक व प्रक्रिया सहकारी संस्था आयोजित जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन दौंड कृषी महोत्सव २०२४ यामध्ये भोर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय खुटवड यांचे सुपुत्र सौरभ दत्तात्रय खुटवड यांना आपल्या शेतीत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल यावर्षीचा जिल्हास्तरीय “कृषीभूषण” पुरस्कार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व भाजपा पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष वासुदेव काळे यांच्या हस्ते दौंड येथे शुक्रवार (दि१६) प्रदान करण्यात आला . यावेळी भोर तालुका भाजपा अध्यक्ष जीवन कोंडे उपस्थित होते.
सौरभ खुटवड यांनी बारे खुर्द येथे आपल्या सहा ते आठ एकर क्षेत्रात पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन सफरचंद या फळ पिकाचा यशस्वी प्रयोग करून भरघोस उत्पादन घेतले . आंबा ज्वारी ,भात या पिकात देखील भरघोस उत्पादन घेतले. विविध रंगाची ढोबळी मिरची, देशी-विदेशी मिरची, विदेशी भाजीपाला यामध्ये ब्रोकोली ,रेड कोबी, फ्लावर, कलिंगड,मेथी अशा भाजीपाला पिकात उत्पादन घेत उल्लेखनीय काम केले. सर्व शेती करताना सेंद्रिय खताचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत पारंपारिक पद्धतीने शेती केली. यासाठी त्यांना सायबेज या कंपनीने मोलाचे मार्गदर्शन सहकार्यही लाभले आहे.
शेती करताना नैसर्गिक, आसमानी संकटे हे गणित माहीत असताना देखील सर्व नैसर्गिक आपत्तीवर संकटावर खुटवड यांनी मात करत आपल्या शेतातील मातीची,धरणी मातेची सेवा केली.नोकरी , उद्योग धंदा या क्षेत्राकडे न जाता शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे हे मानुन आपला पारंपरिक शेती व्यवसाय स्विकारला.
अजून शेतात नवनवीन उपक्रम ,प्रयोग राबवुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त नव नवीन उत्पादने सेंद्रिय खतांचा वापर करीत पारंपारिक पद्धतीने घेणार आहोत असे सौरभ खुटवड व त्यांचे वडील दत्तात्रय खुटवड यांनी सांगितले.