भोर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून स्थानिक व सह्याद्री बचाव टीमच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढले असून मृतदेह व जखमींना भोर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.
भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील उंबर्डेवाडी (ता.भोर) येथील वळणावरुन महाडकडून भोरच्या दिशेने जाणारी चारचाकी इको गाडी (एमएच १२ युजे ९९५७) अंदाजे पाचशे फूट खोल दरीत कोसळून सोमवारी (ता. २७) पहाटे चारच्या सुमारास अपघात झाल्याची घटना घडली.
अपघातात एकाचा मृत्यू तर, आठ जण जखमी झाले असून सर्व पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. प्राथमिक माहितीनुसार, अपघातात शुभम शिर्के (वय २२ जनता वसाहत, पुणे) यांचा मृत्यू झाला आहे.
तर मंगेश गुजर (वय २६, दत्तवाडी), अशोक गायकवाड (वय २९ रा. भवानीपेठ), सिद्धार्थ गणधने (वय २६ रा. दांडेकर पूल), सौरब महादे (वय २२ रा. पर्वती), गणेश लावंडे (वय २७ रा. धायरी) अभिषेक रेळेकर (वय २५ रा. नारायण पेठ), यशराज चंद्रलोकूल (वय २२, घोरपडे पेठ) आणि आकाश आडकर (वय २५ रा. दत्तनगर) अशी जखमींची नावे आहेत.
भोर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून स्थानिक व सह्याद्री बचाव टीमच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढले असून मृतदेह व जखमींना भोर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान, भोर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार राहुल मखरे, सुनील चव्हाण, सागर झेंडे, वारवंडचे पोलिस पाटील सुधीर दिघे, स्थानिक ग्रामस्थ भाऊ उंब्राटकर, विठ्ठल पोळ, नीलेश उंब्राटकर,अक्षय धुमाळ, नीलेश पोळ यांनी घटनास्थळी पोहचून मदत केली. पुढील तपास भोर पोलिस करीत आहेत.