पहिल्या टप्प्यातील पीक कर्ज वाटपाला सुरूवात
भोर तालुक्यात खरीप हंगाम २०२५-२६ च्या पीक कर्ज वाटपास सुरूवात झाली असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भोर शाखा नंबर २ यांच्या वतीने वेळवंड वि का सोसायटी व वडगाव डाळ वि का सोसायटीच्या वतीने खरीप हंगामातील पहिल्या टप्प्यातील वाटप शहरातील चौपाटी येथील पीडीसीसी शाखा दोनच्या सभागृहात करण्यात आले.तज्ञ संचालक भालचंद्र जगताप यांच्या हस्ते वडगाव डाळ येथील शेतकरी हनुमंत धोंडिबा डाळ व वेळवंड येथील विष्णू कृष्णा राजीवडे या दोन शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या पीक कर्जाचे वाटप धनादेशने करण्यात आले.
यावेळी पीडीसीसी बॅंक भोर शाखा दोनचे शाखाधिकारी बाळासाहेब चव्हाण, विकास अधिकारी निखिल खोपडे, महेश बोबडे, वडगाव डाळ सोसायटीचे सचिव प्रकाश पाटणे, चेअरमन भगवान जामदार, वेळवंड सोसायटीचे चेअरमन पंढरीनाथ राजीवडे, सचिव सनी धुमाळ, न्हावी वि का सोसायटीचे चेअरमन अंकुश चव्हाण, सिताराम बैलकर, किसन पांगुळ ,दत्तात्रय मोरे व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. वडगाव डाळ येथील पहिल्या टप्प्यातील ८२ शेतकरी सभासदांना ८८ लाख ९४ हजार तर वेळवंडच्या २५ शेतकरी सभासदांना ६० लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप यावेळी करण्यात आले अशी माहिती सचिव प्रकाश पाटणे यांनी दिली.
बँकेतून शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल, शेतकऱ्यांनीही बँकेच्या सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांचा फायदा घ्यावा तसेच आपल्या पीक कर्जांचा भरणा हा पीडीसीसी बँकेच्या शाखेंमधूनच करावा असे आवाहन यावेळी भालचंद्र जगताप यांनी शेतकऱ्यांना केले. यापुढे सर्व विकास सोसायट्यांना क्यूआर कोड मिळणार असून शेतकरी सभासदांना याचा मोठा फायदा होणार आहे असे बँकेचे शाखा अधिकारी चव्हाण यांनी सांगितले.