बिबट्याच्या वावराने पसुरे परिसरातील नागरिक भयभीत
भोर – भोर तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यातील पसुरे (ता्.भोर) येथील सुरूवातीला येणाऱ्या कुरुंज गावठाण वाडीत संजय जोगळेकर यांच्या फार्म हाऊसवर बिबट्याचा वावर आढळला असुन बिबट्याचे त्यांच्या फार्महाऊसवरील सी सी टी व्ही फूटेज मध्ये राखणदार कुत्र्याला नेतानाणे छायाचित्र कैद झाले आहे अशी माहिती पसुरेचे कार्यक्षम तंटामुक्ती अध्यक्ष मनोज धुमाळ यांनी सांगितले.
भोर तालुक्याच्या मौजे पसुरे येथे दारात बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून कुत्र्याचा फडशा पाडतानाचा व्हिडिओ कुरूंज वाडीतील संजय जोगळेकर यांच्या फार्म हाऊसवरील सी सी टी व्ही फूटेज मध्ये कैद झाला असून गावातील सर्व नागरिक भयभीत झाले आहेत. ज्या वेळी बिबट्या हळुवारपणे राखणदार असलेल्या कुत्र्याला नेत होता त्याचवेळी घराच्या बाजूस असणाऱ्या प्रकाश बिरामणे यांनी आरडाओरडा करत कुत्र्याची सुटका केली.
बिबट्या आज मनुष्य वस्तीवर येऊन पोहोचला असल्याने वनविभाग भोर यांनी तत्काळ पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा अशी ग्रामस्थांची मागणी या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष मनोज धुमाळ यांनी केली आहे. सदरील माहिती वनविभागाचे अधिकारी शिवाजी राऊत वनविभाग भोर यांचे निदर्शनास आणून दिली असून उद्या पासून योग्य ती खबरदारी घेतो असे त्यांनी सांगितले आहे . सर्व नागरिकांनी सजग व जागृत रहावे ,अफवांवरती विश्वास ठेवू नये व आपल्या पशुधनाची व आपल्या जीविताची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.