भोरः तालुक्यातील विविध विकास कामे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या पत्रान्वये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झाली आहेत. जाणूनबुजून या विकास कामांचे श्रेय लाटण्याचे काम आमदार संग्राम थोपटे व काँँग्रेस करीत असल्याचा आरोप शिवतरे यांनी पत्रकार परिषद घेत केला होता. तसेच एकीकडे विकास कामांचे भूमिपूजन करायचे आणि दुसरीकडे आंदोलन करायचे असे देखील शिवतरे म्हणाले होते. या प्रकरणी आता आमदार संग्राम थोपटे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी शिवतरे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
…म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केले आंदोलन
भोर-वेल्हा आणि मुळशी तालुक्यात आम्ही सुचवलेली विकास कामे मंजूर झालेल्या यादीत नसल्याने याबाबत जिल्हाधिकारी यांना विचारणा केली. त्यांनी सांगितल की, मी फक्त या समितीचा सचिव आहे. अजित पवार हे या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी तुमच्या कामाला मंजूरी दिलेली नाही, असे सांगितले. यामुळे आंदोलन करण्यात आल्याचे थोपटे यांनी सांगितले. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या विकास कामांची भूमिपूजन केले असल्याचे थोपटे यांनी स्पष्ट केले.
….त्यामुळे त्यांनी आम्हाला निष्ठा आणि तत्वज्ञान सांगू नये
सुनेत्रा पवार या लोकसभेसच्या रिंगणात उभ्या असताना तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघातून ७ ते ८ हजारांजे मताधिक्य का घटले, याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे असे सवाल थोपटे यांनी उपस्थित केला आहे. यामुळे खरंच तुम्ही निष्ठावंत आहात का, असा प्रतिप्रश्न थोपटे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला निष्ठेच्या गोष्टी आणि तत्वज्ञान सांगू नये, असा सल्ला थोपटे यांनी दिला.
माझं नाव घ्यायचं अन् मोठं व्हायचं
थोड्याच दिवसांत ५ वर्षांमधील कामाचा अहवाल प्रसिद्ध करणार असल्याचे थोपटे यांनी सांगितले. माझ्या भाषेचा स्तर अजून चांगला आहे, मी कधीही कोणावर खालाच्या शब्दांत टीका करीत नाही. दरवेळी माझं नाव घ्यायचं आणि मोठं व्हायचं हे प्रकार आता त्यांनी थांबवावेत, असे देखील थोपटे यावेळी बोलताना म्हणाले. लोकांमध्ये विनाकारण संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे देखील थोपटे यांनी नमूद केले.
रोजगारासंदर्भात स्वतंत्र परिषेद घेऊन भूमिका मांडणार
सातत्याने भोर तालुक्यातील तरुणांसाठी रोजगारविषयी विचारणा करण्यात येत आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांमध्ये सविस्तर या विषयावर बोलणार असून, स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार असल्याचे थोपटे यांनी सांगितले.