राजगडः वेल्हे(राजगड) व मुळशी तालुक्यातील वरसगाव धरणाच्या मुख्य भिंतीवर मंगळवारी मध्यरात्री ते बुधवारी पहाटे तीन वाजेपर्यंत महाकाय मगर ठाण मांडून बसली होती. मगरीला सुरक्षा रक्षकांनी हूसकावून लावण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु मगर ही त्यांच्या अंगावर हल्ला करण्यासाठी चवताळली, त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी तेथून पळ काढला. या मगरीची दहशत इतकी होती की, सुरक्षा अधिकाऱ्यांसह जलसंपदा विभागाचे अधिकाऱ्यांची झोप उडाली. अखेर राजगड (वेल्हे) तालुका वनविभागाने पाचारण केल्यानंतर रेक्सु बावधन वन्यप्राणी पथकाच्या मदतीने पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास या मगरीला पकडण्यात वन विभागाला यश आले. त्यानंतर या मगरीला तिच्या मूळ अधिवास सोडून देण्यात आले. यानंतर भयभीत झालेल्या सुरक्षा रक्षकांसह अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.
साप नाही, ही तर मगर!
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वरसगाव धरणाच्या मुख्य भिंतीवर सुरक्षा रक्षक राहुल जाधव व कुणाल कुराडे हे पाहरा देत उभे होते. त्यावेळी भिंतीवरील मुख्य प्रवेशद्वाराच्या लोखंडी गेटजवळील भिंतीलगतच्या गवतात त्यांना मोठ्या सापासारखा प्राणी दिसला. जाधव याने बॅटरीच्या प्रकाशात जवळ जाऊन पाहिले असता, तेथे त्यांना मगर असल्याचे दिसले. याची माहिती त्यांनी अधिकऱ्यांना कळविली असता, वरसगाव धरणाचे शाखा अभियंता विरेश राऊत व पानशेतचे शाखा अभियंता अनुराग मारके यांनी धरणावर धाव घेतली. प्रवेशद्वार बंद केल्याने तेथून बाहेर पडण्यासाठी मगर दोन्ही बाजूला धाव घेत होती. त्यावेळी हातात बॅटरी घेऊन तिला हुसकावून लावणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या अंगावर मगर चवताळून धावून येत असल्याने सर्वंजण भयभीत झाले.
या घटनेची माहिती राजगड (वेल्हे) तालुका वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी गोविंद लगुंटे यांनी मिळताच त्यांनी बावधन येथील वन्यप्राणी रेक्सु पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मगरीला पकडण्याची एक मोहीम आखण्यात आली. रेक्सु पथकाच्या १५ जवानांसह वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लगुंटे, वनरक्षक मनोज महाजन, सुनिता अर्जुन, स्वप्निल उंबरकर आदी १० कर्मचारी तसेच वरसगाव धरणाचे सुरक्षा रक्षक या मगरीला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. मात्र, प्रवेशद्वाराच्या भिंतीवर पुन्हा-पुन्हा मगर चढत होती. परंतु, ही मगर चवताळून येत होती. हातात बॅटरी, काठ्या असूनही सर्वांना या मगरीला पकडण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अखेर काही तासांच्या शर्तीच्या प्रयत्नांनंतर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मगरीला पकडण्यात वनविभागाला यश आले.
मगरीला पकडून तिला तिच्या मूळ अधिवास क्षेत्रात पहाटे सोडण्यात आले आहे. तिला पुन्हा वरसगाव धरणात सोडलेले नाही. त्यामुळे शेतकरी, नागरिकांनी घाबरू नये.
राजगड तालुका वन विभागागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लगुंटे
मगर धरणात सोडण्यावरून शासकीय यंत्रणेत वादंग
या मगरीपासून सुरक्षा रक्षक तसेच धरण खोऱ्यातील रहिवाशांच्या जीवीताला धोका आहे. त्यामुळे तिला पुन्हा वरसगाव धरणात सोडू नये, अशी विनंती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी करुनही वनविभागाने सुरुवातीला त्यांची विनंती मान्य केली नाही. त्यामुळे वनविभाग व जलसंपदा विभागात काही वेळ वाद झाला. अखेर वनविभागाने मगरीला वरसगावमध्ये सोडले जाणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर हा वाद संपुष्टात आला.
धरणातील पाणी सोडण्यासाठी तसेच पाहरा देण्यासाठी धरणाच्या मुख्य भिंतीसह परिसरात २४ तास अधिकारी, सुरक्षा रक्षक तैनात असतात. मुख्य भिंतीवर मगर ठाण मांडून बसल्याने तिला पुन्हा धरणात सोडल्यास तिच्यापासून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. मगरीला पकडल्यानंतर तिला धरणात सोडू नये यासाठी, जवळपास अर्धा पाऊण तास आम्ही वनविभागाला विनंती करत होतो.
अनुराग मारके, शाखा अभियंता, पानशेत धरण
गेल्या तीन वर्षांपासून धरणात मगरीचे वास्तव्य आहे. धरणातील पाणी कमी झाल्यानंतर उन्हाळ्यात तसेच पाणी वाढल्यानंतर पावसाळ्यात मगर धरणाच्या तिरावर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह पर्यटकांना धोका आहे. पहाटे मगर पकडण्यात आली असली तरी अजून धरणात अनेक मगरी असाव्यात.
देविदास हनमघर, सरपंच, साईव बुद्रुक (ता. राजगड)