भोरः आज म्हणजेच २९ अॅाक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. यातच भोर-राजगड(वेल्हा) आणि मुळशी विधानसभेसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून शंकर मांडेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा केल्याने सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का देण्याता आला आहे. ही जागा युतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला जाईल असे भाकीत वर्तवण्यात आले खरे पण प्रत्यक्षात मात्र ही जागा राष्ट्रवादीला म्हणजेच अजित पवार गटाला सोडण्यात आली आहे.
या मतदार संघातून शिवसेनेचे कुलदीप कोंडे हेच उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवण्यात आली. मात्र, ऐनवेळी अजित पवारांनी मास्टरस्ट्रोक खेळत ही जागा त्यांच्या पक्षाच्या नावे करुन घेतली. यामुळे इथली लढत अटीतटीची आणि चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे. संग्राम थोपटे यांना तगडे आव्हान शंकर मांडेकर उभे करु शकतात असे बोलले जात आहे.
जनतेमध्ये नाराजीचा सूर
भोर-राजगड(वेल्हा) आणि मुळशी तालुक्याचे प्रतिनिधित्व सध्याचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे हे करीत आहेत. १५ वर्ष तालुक्याचे प्रतिनिधित्व केल्यानंतर चौथ्यांदा थोपटे निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. गेल्या १५ वर्षांमध्ये या तिन्ही तालुक्यांचा विकास म्हणावा तसा झालेला नाही. इथला सगळ्यात ज्वलंत मुद्दा म्हणजे बेरोजगारी आहे. या एका गोष्टीमुळे इथला तरुण विस्थापित होऊन पुणे मुंबईसारख्या गावात स्थिरावलेला आहे. एमआडीसीचं अडलेलं घोडं पुढ सरकायचं नाव घेत नाहीये. यामुळे इथली जनतेमध्ये एकप्रकारचा नाराजीचा सूर असल्याचे सांगण्यात येत आहे.
संग्राम थोपटेंना निवडणूक जड जाणार?
राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळालेले शंकर मांडेकर हे गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभेची तयारी करीत आहेत. शिवसेनेकडून तिकीट मिळेल या आशेवर मांडेकर काम करीत होते. नाराज झालेल्या मांडेकरांनी अपक्ष लढविण्याचा पवित्रा हाती घेतला होता. पण अचानक अजित पवार यांनी त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. त्यामुळे संग्राम थोपटे यांना येणारी निवडणूक जड जाणार असे राजकीय जाणकार सांगू लागले आहेत.