राजगड न्युज नेटवर्क
पुरंदर : सासवड-जेजुरी पालखी महामार्गावरती सासवड-खळद गावच्या शिवेवर बोरावके मळा नजीक केळीचा ओढा परिसरात रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या विहिरीमध्ये ८० फुट खोल पाण्यात रिक्षा पडून यातील नवविवाहित दांपत्यासह एका महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.तर दोघांना वाचवण्यात पोलिसांना यश आले.
या संदर्भात मिळालेले माहितीनुसार रिक्षातील रोहित विलास शेलार (वय-२३), वैष्णवी रोहित शेलार (वय-१८), श्रावणी संदीप शेलार (वय-१७) यांचा मृत्यू झाला तर आदित्य मधुकर घोलप (वय-२२), शीतल संदीप शेलार (वय-३५) सर्व राहणार धायरी पुणे हे जखमी झालेत.
याबाबत घटनास्थळी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रोहित व वैष्णवी यांचा नवीनच विवाह झाला असून, ते सोमवारी (ता. २५)आपल्या नातेवाईकांसह जेजुरी येथे देवदर्शनासाठी आले होते. देवदर्शन करून परतत असताना रात्री ०८ वाजण्याच्या सुमारास ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा ही विहिरीमध्ये पडल्याची घटना घडल्याचे समजते.
तर याबाबत मंगळवारी (ता. २६) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोलिसांना याची माहिती मिळाली. खळद येथील युवक देवेंद्र कामथे व तेजस कामथे हे सकाळी व्यायामासाठी रस्त्याने जात असताना त्यांना विहिरीतून वाचवा वाचवा असा आवाज आल्याने त्यांनी बाजूच्या विहिरीत पाहिले असता एक पुरुष व महिला दोरीला लटकल्याचे व आम्हाला वाचवा वाचवा असा आक्रोश करीत असल्याचे त्यांना आढळले.
याबाबत त्यांनी तात्काळ सासवड पोलीस स्टेशनची संपर्क केला असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या दोघांना जखमी अवस्थेत बाहेर काढले. तर अन्य याचवेळी अन्य तीन जण विहिरीमध्ये असल्याची माहिती उघड झाली.
यानंतर जेजुरी-सासवड येथील अग्निशामक दल, क्रेन त्याचप्रमाणे भोर येथुन भोईराज जलआपत्ती संघ घटनास्थळी येऊन त्यानी मृत व्यक्ती व रिक्षा विहिरीतून बाहेर काढले. याबाबत पुढील तपास भोर पुरंदरचे पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव अधिक तपास करीत आहे.