भोरः विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची आज दि. ४ नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. मागचे ४ ते ५ दिवस हे दिवाळीचे असल्याने सर्वजण दिवाळीच्या सणात व्यग्र होते. याच काळात पक्षातील नाराजांची मनधरणी करण्याचे परफेक्ट टाईम मिळाले. बंडोबांना धंडोबा करण्यात काही अंशी पक्षातील बड्या नेत्यांना यश आले असले तरी अद्यापर्यंत अनेकजण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. भोर विधानसभेसाठी मागच्या दोन निवडणुकीत विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांना शिवसेनेचे कुलदीप कोंढे यांनी लढत दिली होती. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून (शिंदे) कोंडे यांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. मात्र, ऐनवेळी दुसऱ्या पक्षातून आयत केलेल्या उमेदवाराला युतीकडून संधी देण्यात आली. यामुळे कोंडे हे नाराज होते. त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेत उमेदवारी अर्ज दाखल केला. ५ नोव्हेंबरला भोरमध्ये त्यांची विराट सभा पार पडणार आहे, यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येत आहे. कुलदीप कोंडे हे या सभेत काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
आज दि. ४ नोव्हेंबर उमदेवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख आहे, मात्र कुलदीप कोंडे अपक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम असून कोणत्याही परिस्थितीमध्ये अर्ज माघार घेणार नसल्याचे कुलदीप कोंडे युवा मंचच्या वतीने सांगण्यात आले आहे. भोर शहरातील राजा रघुनाथराव विद्यालयाच्या प्रांगणावर ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास भव्य विराट सभा पार पडणार आहे. या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात येत असून, २० हजार नागरिकांच्या दृष्टीने सभेच्या ठिकाणी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. कुलदीप कोंडे युवा मंचाच्या पदाधिकाऱ्यांकडून या सभेच्या माहितीसाठी वाड्या वस्त्यांवर घोंगडी बैठका घेतल्या जात आहे. कोंडे यांच्या समर्थकांकडून सभेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याबाबतची माहिती कुलदीप कोंडे युवा मंचाचे पदाधिकारी विकास बाप्पू चव्हाण यांनी दिली.
थोपटेंच्या दौऱ्याला सुरूवात, कोंडे यांची भव्य सभा
आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गेले ३ टर्म संग्राम थोपटे या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांनी प्रचार दौऱ्याला सुरूवात केली असून भोर, वेल्हा आणि मुळशी भागातील गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या या दौऱ्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. कुलदीप कोंडे यांची भव्य विराट सभा ५ नोव्हेंबर या दिवशी होत असून, या सभेच्या माध्यमातून कोंडे आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. मात्र, ते या सभेत नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
चौरंगी लढत, दोन अपक्ष
भोर विधानसभेच्या निवडणुकीच्या रणांगणात युतीमधून इच्छुकांची भाऊगर्दी मोठी होती. किरण दगडे यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार करीत त्यादृष्टीने तयारीला सुरूवात केली होती. मग त्यामध्ये यात्रा, आरोग्य शिबीर, विविध प्रकाराचे कार्यक्रम दगडे यांच्या वतीने घेण्यात आले होते. कुलदीप कोंडे यांचे पारडे जड असतानाच राष्ट्रवादी(अजित पवार) पक्षाकडून शंकर मांडेकर यांना उमेदवारी मिळाली. कोंडे हे युतीचे अधिकृत उमेदवाराचे दावेदार होते. मात्र त्यांचा पत्ता कट करून मांडेकर यांना संधी देण्यात आली. यामुळे कोंडे आणि दगडे हे नाराज झाले. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, सध्याच्या परिस्थितीमध्ये कुलदीप कोंडे, संग्राम थोपटे, शंकर मांडेकर, किरण दगडे अशी चौरंगी लढत होणार आहे. या लढतीकडे आता भोर, वेल्हा(राजगड) आणि मुळशीतील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.