भोरः अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी येथील राजा रघुनाथराव विद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभेच्या माध्यमातून विधानसभेच्या आखाड्यात झुकेना नहीचा नारा देत निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी त्यांनी पैसे नसल्यामुळे तिकीट नाकारले असल्याचा गौप्यस्फोट केला. तसेच ५ वर्ष मला संधी देऊन बघा, असे आवाहन करीत तालुक्याचा कायापालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. माझा कार्यकर्ता माझ्यासाठी श्वास आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. स्वःताला सतत कार्यसम्राट म्हणत मिरवायचे, पण १५ वर्षांत विकास झाला का ? असा सवाल कोंडे यांनी सभेच्या माध्यमातून उपस्थित केला.
बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंमरोजगार उपलब्ध करुन देणार, प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्नशील असणार, तालुक्यातून खेळाडू तयार करण्यासाठी विशेष लक्ष देणार, २०३२ मध्ये होणाऱ्या अॅाल्मपिकसाठी तालुक्यातील खेळाडू सहभागी करण्यासाठीचा विडा उचलत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एमपीएसचीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठीशी उभे राहणार, पाणी, रस्ते, वीज आदी गोष्टींकडे लक्ष देऊन त्या प्राध्यान्याने सोडविल्या जाणार असल्याची ग्याही कोंडे यांनी दिली. म्हणून ५ वर्षांसाठी शेतकऱ्याच्या पोरांना विधानसभेत पाठविण्याची संधी द्या, तालुक्याचा कायपालट केल्याशिवाय राहणार नसल्याचे कोंडे यावेळी म्हणाले.
यावेळी राजा रघुनाथराव विदयालय मैदानावर अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे, अमोल पांगारे, गणेश धुमाळ, शलाका कोंडे, पुनम पांगारे, विकास चव्हाण, नारायण कोंडे, बाळासो जायगुडे, महेंद्र भोरडे, दिपक बरडे, संदीप रासकर, अर्चना भोर, नितिन सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते आणि कोंडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेला मोठा जनसमुदाय लाभलेला होता. सभेला महिलांचा देखील चांगला सहभाग पाहिला मिळाला.
२०१९ मध्ये तुम्ही काय केले, हे आम्हाला माहित आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला निष्ठेच्या गोष्टी सांगू नका, तुम्ही तालुक्यातील लोकांसोबत गद्दारी करीत इथल्या लोकांना फसवलं आहे. माझ्यावर लोकाचं खूप प्रेम आहे, त्यांच्या विश्वासाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मी तडा जावू देणार नाही, असा विश्वास कोंडे यांनी व्यक्त केला. तसेच मतदानासाठी आता केवळ १५ दिवस शिल्लक राहिलेले आहेत, त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. नसरापूर, कापूरव्होळ, किकवी या भागांचा काय विकास झाला असे म्हणत भोरची कचऱ्याची अवस्था काय आहे, कारखान्याची झालेली दयनीय अवस्था पाहता तुम्हाला जर कारखाना चालवायला येत नसेल तर राजीनामा द्या, असे ते म्हणाले. स्वःताचा नाकार्तेपण झाकण्यासाठी जनेतला वेठीस धरण्याचे काम करून त्यांचा छळ केला जात असल्याचा आरोप कोंडे यांनी यावेळी केला.
‘त्या’वेळी तुम्ही अज्ञातवासात निघून गेला होताः कोंडे
कोरोना महामारणीसोबत संपूर्ण जग हे दोन हातात करीत होते. त्याकाळात कोरोनाबाधित असणाऱ्या लोकांशी संपर्क करून त्यांना धीर देण्याचे काम केले. कोणाला अॅाक्सिजन पुरवला, कोणाला रिमेडिसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून दिले. काहींना प्लाज्माची गरज होती, त्यांची गरज पूर्ण केली. स्वःताच्या शेतातील कांदा गोरगरिबांसाठी दिला. त्या काळात तुम्ही अज्ञातवासात निघून गेला होता, त्यावेळी तुम्ही कोणतीही मदत केली नसल्याचा आरोप कोंडे यांनी संग्राम थोपटे यांच्यावर केला.
१ वर्षांत एमआयडीसी केली नाही तर बापाचं नाव लावणार नाहीः कोंडे
मला एकदा संधी देणे गरजेचे आहे, ५ वर्षांच्या काळात पहिल्याच वर्षांत एमआयडीसी केली नाही, तर बापाचं नाव लावणार नाही असा शब्द कोंडे यांनी भोरवासियांना यावेळी बोलताना दिला. मतदार संघात काम करण्याची मानसिकता आणि इच्छाशक्ती प्रबळ लागते. सतत कार्यसम्राट म्हणून मिरवायचे पण काम करायचे काय हेच माहित नसल्याची उपरोधिक टीका कोंडे यांनी संग्राम थोपटे यांच्यावर केली.
पहिल्याच सभेला अभूतपूर्व गर्दी
अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांच्या पहिल्याच सभेला भोरवासियांचा चांगला प्रतिसाद लाभला असून, त्यांच्या सभेला मोठ्या प्रमाणाव नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच महिला, तरुण यांचा सहभाग देखील लक्षणीय होता.