जेजुरीः सासवडमध्ये आघाडीचे उमेदवार संजय जगताप, युतीचे उमेदवार विजय शिवतारे आणि संभाजीराव झेंडे यांची विविध ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत जाहीर सभा पार पडल्या. दिवाळीचे काही दिवस सोडल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरूवात झाली आहे. काल दि. ४ नोव्हेंबर रोजी युतीमधील अनेकांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्या सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. यामुळे रिंगणात १६ उमेदवार असले तरी मुख्य लढत ही तीन चेहऱ्यांभोवतीच असणार आहे. जगताप, शिवतारे आणि झेंडे या तिन्ही उमेदवारांनी स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवून मतदार संघ पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. यामुळे आता आगामी काही दिवसांत प्रचाराला वेग प्राप्त होणार आहे.
तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता
राज्यातील सध्याचे राजकारण पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादी दुंभलेली आहे. दोन्ही पक्षांचे दोन गट तयार झाले आहेत. काही ठिकाणी तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची मोठी पंचाईत झाली असून, कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न त्यांना पडला आहे. पक्षातील बड्या नेत्यांना मधस्थी करून बंड हाणून पाडण्यात बऱ्यापैकी यश आले असले तरी काही ठिकाणी मात्र अपयश आले आहे. परिणामी अनेकांनी बंडखोरी करीत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. पुरंदर-हवेली मतदार संघातून सुरूवातीला संभाजीराव झेंडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना राष्ट्रवादी(अजित पवार) पक्षाचा एबी फॅार्म देण्यात आला. त्यामुळे येथे युतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत पाहिला मिळणार असे बोलले गेले. मात्र, आता दुसरी अशी बाजू आहे की येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
प्रचाराला जोमाने सुरूवात
संजय जगताप यांच्याकडून गावभेट दौऱ्याला सुरुवात झाली असून, तालुक्यातील विविध गावांना भेट देत आहेत. त्या ठिकाणच्या नागरिकांशी संवाद साधताना दिसत आहेत. सोशल मीडियाचा वाप मोठ्या प्रमाणात केला जात आहे. तरुण कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग त्यांच्या प्रचार दौऱ्यात पाहिला मिळत आहे. विजय शिवतारे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून विकास कामांचा लेखाजोखा मांडताना दिसत आहे. तालुक्यातील विविध गावांना भेट त्यांनी निवडणुकीच्या अगोदरपासून दिल्या आहेत. वाड्या वस्त्यांवरच्या नागरिकांची त्यांच्या प्रचार दौऱ्याला साथ मिळताना दिसत आहे. संभाजीराव झेंडे यांनी गेल्या अनेक दिवसांपासूनच निवडणुकीच्या रिंगाणात दाखल होण्याचे संकेत दिले होते. तेव्हापासूनच निवडणूक लढवण्यावर ते ठाम होते. तालुक्यातील जुन्या जाणत्या जेष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीचे सत्र त्यांनी सुरू केले आहे. नवा चेहरा असल्याने नागरिकांचा त्यांना प्रतिसाद मिळताना विशेषकरून तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.