महाविकास आघाडी जोरदार, तर महायुतीत बिघाडदार
भोर – २०३ भोर विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या अर्जांचा सोमवारचा(दि.४) माघारीचा दिवस नाट्यमय घडामोडीत गेला. १५ पैकी ९ उमेदवारांनी शेवटच्या क्षणापर्यंत माघारी घेतली आणि ६ उमेदवार रिंगणात राहीले. यामध्ये पक्षादेश डावलत बंडखोरी करणारे शिवसेना शिंदे गटाचे कुलदिप कोंडे हे आपल्या निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम रहात अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. शिंदे गटाचे बाळासाहेब चांदेरे यांनी महायुतीचा आदेश मानत माघार घेतली .भाजपचे किरण दगडे यांनी आपल्या पत्नी पियुषा दगडे यांचा अर्ज माघारी घेतला मात्र लोकहितासाठी व लोकांच्या आग्रहाखातर आपण परिवर्तनासाठी अर्ज ठेवत आहोत असे स्पष्ट केले आणि रिंगणात राहिले. तालुक्यात कुलदिप कोंडे व किरण दगडे हे माघारी घेतील व संग्राम थोपटे आणि शंकर मांडेकर अशी दुरंगी मोठी लढत होईल हीअसे सर्वांना वाटत होते परंतु आता मुख्य चौरंगी लढत होणार आहे असे चित्र स्पष्ट झाले आहे.
सर्वात मोठा मतदारसंघ, पारडे कोणाचे जड ? राज्यातील तीन तालुके मिळुन भौगोलिक व अतिदुर्गम भाग असणारा २०३ भोर विधानसभा मतदारसंघ संघ सर्वात मोठा मतदारसंघ आहे.भोर तालुक्यात एक लाख सत्तर हजार दोनशे तेरा, वेल्हा (राजगड) तालुक्यात चोप्पन्न हजार तीस , तर मुळशी तालुक्यात दोन लाख सहा हजार पंधरा असे एकूण चार लाख तीस हजार दोनशे अष्ट्याहत्तर मतदान आहे. शिल्लक राहीलेल्या पंधरा दिवसांत मतदार संघातील सर्व गावांत ,खेड्यापाड्यात, दुर्गम भागात मतदार जनतेपर्यंत पोहचणे अवघड आहे. परंतू संग्राम थोपटे यांनी नियोजित आखणी करत तीनही तालुक्यातील सर्वच गावात मध्ये आपली प्राथमिक प्रचारफेरी आपल्या विकास कामांचा आलेख वाचत पुर्ण केली आहे. किरण दगडे, कुलदिप कोंडे, शंकर मांडेकर यांनीही फॉर्म भरताना प्रचंड शक्ती प्रदर्शन करत आपण कोठेही कमी नाही असे दाखविले आहे. जेष्ठ केंद्रीय नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री अनंतराव थोपटे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तीनही तालुक्यातील नेते, शिवसेना उ बा ठा गटाचे तीनही तालुक्यातील नेते असे महाविकास आघाडीचे काम करणारा निष्ठावंत जुन्या पिढीचा मतदार वर्ग संग्राम थोपटेंच्या बाजुने आहे. तर एम आय डी सी चा मुद्दा लावून धरत युवा वर्गातील मतदार किरण दगडे व कुलदिप कोंडेच्या पाठीशी भक्कमपणे आहे.अजित पवार व राष्ट्रवादीच्या घड्याळाला या मानणारा वर्ग शंकर मांडेकर यांच्या पाठीशी असला तरी सध्या तरी प्रचार दौरा, जनसंवाद यात्रा पहाता मतदारसंघात संग्राम थोपट यांचीच हवा जोरदार चालू असल्याचे चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे
मतदान विभागणीत संग्राम थोपटेंकडे जनतेचा कौल मतदानात मोठ्या असणाऱ्या मुळशीतुन शंकर मांडेकर व किरण दगडे हे मातब्बर आहेत तर भोर तालुक्यातुन संग्राम थोपटे व कुलदिप कोंडे हे दिग्गज आहेत सर्वांची नजर वेल्हातील मतदानावर असली तरी वेल्ह्यातील निष्ठावंत, दिग्गज नेते,जनतेचा थोपटेंकडे कल आहे अशी चर्चा आहे. त्यामुळे तीनही तालुक्यातील मतदान विभागणीत संग्राम थोपटेंचेच पारडे जड असल्याची चर्चा या मतदारसंघात सर्वत्र सुरू आहे.
मतदार जनताच ठरविणार भोरचा आमदार ? अजित पवारांचे नवखे भिडू जिल्हा परिषदेला समोरचाचे डिपॉझीट जप्त करणारे शंकर मांडेकर ? मागील वेळेस थोड्या फरकाने आमदारकी गमावलेले लोकनेते कुलदिप कोंडे ? आधुनिक काळातील श्रावणबाळ म्हणून ओळखले जाणारे, दिवाळी किट वाटप , महिलांना तीर्थक्षेत्र दर्शन घडविणारे महिलांच्या मनातील भावी आमदार किरण दगडे ? सलग तीन वेळा आमदारकीची हॅट्ट्रिक मारून विकास कामांच्या जोरावर पुन्हा विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज असलेले संग्राम थोपटे ? यापैकी कोण आमदार म्हणून विधानसभेवर जाणार हे लवकरच मतदारसंघातील सुज्ञ जनताच ठरविणार आहे.