भोर: भोरेश्वर लॉन्स, भोरेश्वरनगर येथे राजगड भूषण – २०२४ भव्य वारकरी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्कार ह.भ.प.मारुती महाराज बदक, ह.भ.प.बाळकृष्ण महाराज दसवडकर आणि वारकरी भूषण पुरस्कार ह.भ.प.चंद्रकांत महाराज जगताप, ह.भ.प. रामभाऊ महाराज रेणुसे यांना प्रदान करण्यात आला. तसेच तब्बल ३५० वारकरी संप्रदायातील मंडळींना देखील राजगड भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राजगड भूषण 2024 वारकरी सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन भोर विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे व अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका स्वरूपा थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने खांद्यावर वारकरी संप्रदायाची पताका घेऊन चालणारे वारकरी, त्यांच्या मुखातून होणारा माउली – तुकोबारायांचा अखंड जयघोष असे भक्तीमय वातावरणाचा संस्मरणीय अनुभवाचे दर्शन झाले.
प्रसंगी वै.प.पू. सणस बाबा आश्रम, भोर – राजगड तालुक्यातील सर्व वारकरी शिक्षण संस्था व वारकरी सांप्रदाय व जय हरी ग्रुप भोर पदाधिकारी उपस्थित होते.