उत्रौली शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, शिक्षकांच्या कषटाचे चिज ,गावक-यांकडु कौतुक.
भोर – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्रौली गावच्या आदर्श शाळेने पुणे जिल्ह्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ” मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा “ या अभियानात पुणे जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवून उत्रौली गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शैक्षणिक वर्ष सन २०२४- २५ मध्ये सहभागी झालेल्या सर्व शाळांचे या अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांचे मूल्यमापन केले. या अभियानात सहभागी झालेल्या शाळांना विविध उपक्रमातून गुणांकन देण्यात आले होते. यात विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग, शाळा व परिसराचे सौंदर्य, शाळेची इमारत, संरक्षित भिंत, वर्ग बोलक्या भिंतींची उभारणी, विद्यार्थी मंत्रिमंडळ, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, परसबाग,अमृतवाटिका यांची निर्मिती,मेरी माटी मेरा देश उपक्रम, विद्यार्थ्यांनी चालवलेली बचत बँक, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण, महावाचन चळवळ, शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन, स्वच्छता मॉनिटर अभियान, राष्ट्रीय एकात्मता संदर्भात विविध उपक्रम, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, आदींचा यात समावेश होता. याचबरोबर व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग,यामध्ये विद्यार्थी आरोग्य तपासणी,विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन,आर्थिक साक्षरता कौशल्य विकास यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन, दानशूर व्यक्ती संस्था यांच्याकडून मिळालेल्या वस्तू व सेवा स्वरूपातील देणगी, शाळा व्यवस्थापन समितीने उत्तम पार पाडलेले कामकाज, तंबाखूमुक्त प्लास्टिक मुक्त शाळा, माजी विद्यार्थी पालक सेवाभावी संस्था यांचा अधिकाधिक सहभाग व योगदान, अशा विविध मुद्द्यांवर व निकषानुसार गुणांकन करून विजयी स्पर्धक शाळांची जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली. यामध्ये आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्रौली शाळा सरस कामगिरीच्या जोरावर संपूर्ण जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली.
उत्रौली शाळेला प्रेरणा देणारे पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, भोर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे , उत्रौली केंद्राचे केंद्रप्रमुख अंजना वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यपिका चोरघे सविता,संगीता पापळ, अनिता सुतार, वैशाली चिंचकर, अनिता लोखंडे, विठ्ठल दानवले, अश्विनी पवार, अमर उभे तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य , त्यांना बहुमूल्य सहकार्य करणारे ग्रामस्थ, तरुण मंडळ व सर्व विद्यार्थी आणि पालक यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
वक्तृत्व, लेझीम, विज्ञान प्रदर्शन, लोकनृत्य, चित्रकला, भजन , प्रश्नमंजुषा या विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवणारी उत्रौली शाळा पुणे जिल्हा परिषदेच्या प्रथम क्रमांकाच्या अध्यक्षा चषकाची यापूर्वीच मानकरी ठरलेली आहे.शाळेत छंद वर्ग, रांगोळी, नाटक, विणकाम, शिवणकाम, नृत्य, वादन चित्रकला,ओरिगामी इत्यादी उपक्रमातून मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारत आहेत. प्रत्येकाला प्रेरणा देणारी उत्रौली शाळा इतरांपेक्षा वेगळी यासाठी ठरते की जिल्हा परिषदेची शाळा असूनही गुणवत्तेच्या ,भौतिक सुविधांच्या बाबतीत खाजगी शाळांपेक्षा ती कुठेही कमी नाही त्यामुळेच या शाळेत भोर शहर व आजूबाजूच्या परिसरातून अनेक विद्यार्थी दाखल होत आहेत असे या शाळेचे शिक्षक विठ्ठल दानवले यांनी सांगितले.