भोर: वैद्यकीय सेवा सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी भोर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या भाटघर धरण क्षेत्रातील दुर्गम भागातील नागरिकांना तात्काळ तरंगत्या दवाखान्यामार्फत वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, या हेतूने हा स्तुत्य उपक्रम राबिण्यात येत आहे. भुतोंडे येथून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून, याचे उद्घाटन भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनावडे यांच्या हस्ते पूजन करुन करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयदीपकुमार कापसीकर, लॉन चालक राजेंद्र कंक, ग्रामसेवक रणजीत ननावरे, कृष्णा किंद्रे सह ग्रामस्थ उपस्थित होते.
या लॉन्चद्वारे धरणाच्या पलीकडे असलेल्या गावातील रुग्णांना तत्काळ तरंगत्या दवाखान्याच्या माध्यमातून उपाचार घेता येणार आहेत. आठवड्यातील बुधवार आणि शुक्रवार या दोन दिवशी हे लॉच उपलब्ध राहणार आहे. यातील बुधवारी बोपे, कुंबळे, वाघमाची घुमट, सांगवी, डेरे, भुतोंडे या गावांसाठी तर शुक्रवारी गुहिणी, खुलशी, चांदवणे, डेरे, भांड्रवली, मळे, सुतारवाडी, नानवळे असा प्रवास या तरंगत्या दवाखान्याचा असणार आहे.
दरवर्षी ‘ही’ सेवा दिली जाते
भोर तालुक्यातील भाटघर धरण क्षेत्रामध्ये अतिदुर्गम परिसर आहे. राज्य सरकारच्या वतीने येथील नागरिकांना उपचारासाठी बाहेरगावी किंवा मोठ्या शहरांमध्ये जाणे शक्य होत नाही, त्यामुळेच येथे दरवर्षी ही लॅाच आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते. पावसाच्या काळात ही सेवा बंद असते. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात या सेवेला सुरूवात होते. या सेवेत वैद्यकीय पथकामध्ये लाँच ऑपरेटर यांच्यासह डॉक्टर आणि नर्स, शिपाई असतात.