भोरः भोर-कापुरव्होळ रस्त्यावर दोन ठिकाणी नविन पुल नसल्याने पावसाळ्यात निरानदीचे पाणी पुलावर येऊन रस्ता बंद होतो. त्यामुळे सुमारे ३१५ कोटी खर्च करुन सुरु असलेल्या काँक्रेट रस्त्याचा उपयोग काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. यामुळे आता रस्त्यावर दोन ठिकाणी नविन पुल करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. भोर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कापुरव्होळ-भोर वाई- हा सुमारे ५८ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी तब्बल ३१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. रस्त्यावरील चढ उतार कमी करणे, वळणे रुंद करणे, नविन मो-या टाकणे, संरक्षक भिंत घालणे, आंबाडखिंड घाटात रस्ता रुंद करणे, दरीच्या बाजूला कठडे घालणे अशी मागणी आहे.
जुन्याच पुलांची मलमपट्टी
तसेच भोर-कापुरव्होळ १० मीटर रुंदीचा रस्ता भोर शहरात १२ मीटर, तर भोर ते वाई ७ मीटर रुंदीचा रस्ता करण्यात येणार आहे. कापुरव्होळ ते भाटघर, भोर ते नेरे आंबाडेपर्यत रस्त्यावरील काम अर्धवट झालेले आहे. रस्त्याला साईड पट्या, संरक्षक कठडे, गटारे, मोऱ्या हि कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत. दरम्यान, कापुरव्होळ भोर रस्त्यावरील कासुर्डी गु. मा गावाजवळ गुंजवणी नदीवरील जुना दगडी पुल, माळवाडी ते वडवाडी दरम्यान निरानदीवरील पुल आणी सांगवी गावाजवळचा निरा नदीवरील लहान पुल हे ८० वर्षांपुर्वी बांधलेले दगडी मचवे असलेले पुल आहेत.
नवीन पुल बांधण्याची प्रमुख मागणी
मात्र, सदर रस्त्याच्या कामात नविन पुल प्रस्तावित करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे जुन्या पुलांनाच डागडुजी केली जाणार आहे. यामुळे दर वर्षी पावसाळ्यात नदीपात्रापासून दोन पुलांची उंची अत्यंत कमी असल्यामुळे सांगवी व माळवाडी वडवाडी येथील पुल भाटघर आणी निरादेवघर धरणातून पाणी सोडल्यावर सदरचे दोन्ही पुल पाण्याखाली जातात. यामुळे भोर-कापुरव्होळ रस्ता बंद होतो. मग कोट्यावधी रुपये खर्च करुन नविन काँक्रेट रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार असेल, तर सदर रस्त्याचा काय उपयोग असा प्रश्न प्रवासी नागरिकांचा आहे. सांगवी आणी माळवाडी येथे नविन मोठे पुल करण्याची मागणी प्रवासी नागरिक करीत आहेत.
भोर कापुरव्होळ रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून नविन रस्ता काँक्रेटचा होत आहे. मात्र, सदर रस्त्यावरील माळवाडी आणी सांगवी येथे जुने पुल पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणी निरादेवघर व भाटघर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर नदीला पूर येऊन पुल पाण्याखाली जातात. यामुळे रस्ता वाहातुकीस बंद होता. नविन पुल न केल्याने पुल पाण्याखाली जाऊन रस्ता बंद झाल्याची घटना सतत घडत असते. त्यामुळे नविन पुलांची गरज आहे. कापुरव्होळ-भोर-वाई रस्त्याच्या कामासाठी अशियाई बँके डेव्हपमेन्टच्या माध्यमातून निधी मंजूर केला असून, सदर बँकेकडून नविन मोठे पुलांसाठी निधी दिला जात नाही. त्यामुळे अंदाजपत्रक पत्रकात नवीन पुल प्रस्तावित केलेले नाहीत. पुलांसाठी सीआरएफ किंवा नाबार्डमधून निधी मंजूर करुन पुलांची कामे करावी लागतील.
-संजय वागज (उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, भोर ), योगेश मेटेकर शाखा (अभियंता सार्वजनिक बांधकाम भोर )
भोर-कापुरव्होळ रस्ता समेट काँक्रेटचा होणार आहे. यामुळे वाहतूक जलद होईल, मात्र रस्त्यावरील दोन ठिकाणी नविन पुल न केल्याने पावसाळ्यात पुलावर पाणी आल्यामुळे रस्ता बंद होत आहे. मग कोट्यावधी रुपये खर्च करुन काय उपयोग नविन पुल होणे गरजेचे आहे.
-सचिन देशमुख (सामाजिक कार्यकर्ते)