भोर: भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील शिरगाव (ता. भोर) येथील प्रेक्षणीय धबधब्यावर एक आणि वारवंड गावच्या हद्दीत नीरा-देवघर धरणाच्या नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी एक असे दोन सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत. यामुळे कुंटुंबासोबत पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना त्यांच्या कुटुंबासमवेत धबधब्याचे फोटो काढून आनंद घेणे शक्य झाले आहे. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून हे सेल्फी पॅाईंट उभारण्यात आलेले आहेत.
शासनाच्या योजनेतून ‘सेल्फी पॅाईंट’
शिरगावचा धबधबा हा वरंधा घाटातील मुख्य पर्यटनस्थळांपैकी एक आहे. पावसाळ्यात येथील धबधब्याखाली अनेक जण भिजण्याचा आनंद लुटतात. मात्र, महिला व तरुणींची कुंचबणा व्हायची आणि त्यांना धबधब्याचे फोटो काढता येत नव्हते. यासाठी शासनाच्या वैशिष्टपूर्ण योजनेतून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यामधून शिरगाव येथील धबधब्यावर एक आणि वारवंड गावच्या हद्दीत नीरा-देवघर धरणाच्या नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी एक असे दोन सेल्फी पॉईंट उभारण्यात आले असल्याची माहिती भोरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय वागज यांनी दिली.
सेल्फी पॅाईंटवर एकाच वेळी सात ते आठ जण सेल्फी घेऊ शकतात
धबधब्याच्या मधोमध सेल्फी पॉईंट उभारल्यामुळे पर्यटकांना धबधब्यातून पडणाऱ्या पाण्याचा आनंद घेता येणे शक्य झाले आहे. षटकोनी आकाराच्या सेल्फी पॉईंटवर एका वेळी सात ते आठ जण थांबून धबधब्याचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय धबधब्याच्या ठिकाणचा वळणाचा रस्ताही मोठा करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना वाहतूकीसाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही.