पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे
पुणे शहराचे महापौरपद भूषवून केंद्रात राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन करून ते प्रवाशांसाठी सुरू केले आहे. तर आता याच विमानतळाच्या नावासाठी मोहोळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांची भेट घेत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे’ नाव देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. मोहोळ यांनी केलेल्या मागणीमुळे या विमानतळासाठी आणखी काही नवीन नावांची मागणी देखील समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पुण्याचे विमानतळ असलेले लोहगाव हे जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचे आजोळ आहे. यामुळे लोहगाव आणि तुकोबारायांचे नातं जिव्हाळ्याचं होतं. तसेच लोहगावच्या गावकऱ्यांचीही हीच इच्छा असून, महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाचीही संवेदना या विषयाशी जोडलेली आहे. त्यामुळे लोहगावच्या विमानतळाला संत तुकोबारायांचं नाव देणं, हे अधिक समर्पक असणार आहे, असे नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यासाठी, राज्य शासनाने तसा प्रस्ताव तयार करावा आणि केंद्र सरकारकडे पाठवावा, यासाठी मोहोळ यांनी या नेत्यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली.