ठाणेः शहरातील नामांकित सरस्वती शाळेत दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने पट्टीने मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. शिक्षिकेने विद्यार्थ्याच्या डोक्याला पट्टीने मारहाण केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला आहे. यामुळे मुलाच्या पालकानी मारहाण करणाऱ्या शिक्षिकेला याचा जाब विचारला असता, शिक्षिकेने अरेरावीची भाषा वापरली असल्याचा प्रकार पुढे आला आहे. यामुळे शाळेने मारहाण करणाऱ्या शिक्षिकेला बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. पंकजा राजे नामक मारहाण करणाऱ्या शिक्षिकेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिन्यांभरापूर्वी दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला या शिक्षिकेने डोक्यात पट्टीने मारहाण केली होती. ही मारहाण इतकी जास्त होती की विद्यार्थ्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला. तसेच दुसऱ्या एका मुलाला खोटं बोलत असल्याच्या कारणावरुन त्याच्यावर एक कविता लिहिली. ती कविता वर्गातील इतर मुलांना या मुलांसमोर म्हणायला भाग पाडले, असा आरोप देखील या शिक्षिकेवर करण्यात आला आहे. या अगोदर देखील विद्यार्थ्यांना त्रास देण्याचे प्रकार घडले असल्याचा आता पालकांकडून बोलले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्यांना अपमानस्पद वागणूकीचा खेळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे पुन्हा एकदा मुले सुरक्षित आहेत का? असा प्रश्न पडू लागला आहे.
संबधित शिक्षेकला बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरु असून, त्यांच्याविरोधात नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार असल्याचे जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
त्या मॅडमची शाळेत दहशत
हा संपूर्ण प्रकार मनसेचे अविनाश जाधव यांना पालकांनी सांगताच त्यांनी थेट शाळा गाठत या प्रकरणी शाळा प्रशासनाला विचारपूस केली. तर त्या वेळी शाळेच्या ट्रस्ट यांनी मॅडमची शाळेत दहशत असल्याचे त्यांना अॅानकॅमेरा सांगितले असल्याचे जाधव यांनी सांगितले.