अकोलाः बदलापूर येथील चिमुकलीवरील लैंगिक शोषणाची घटना ताजी असताच अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथील एका शाळेत शिक्षकानेच सहा मुलींचा विनयभंग करुन छळवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकार हा काजीखेड येथील शाळेत घडला असून, आरोपी शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे या भागात नागरिकांमध्ये प्रचंंड संतपाची लाट उसळ्याची पाहिला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काजीखेड येथील शाळेत आठवीत शिकत असणाऱ्या सहा अल्पवयीन मुलींना आरोपी शिक्षक अश्लील व्हिडोओ दाखवत, तसेच व्हिडिओ दाखविताना नराधम शिक्षकाने मुलींना चुकीच्या हेतूने स्पर्श करीत अश्लील संभाषण केल्याची माहिती आहे. या घृणास्पद प्रकाराची माहिती पीडित मुलीने घऱी सांगितल्यानंतर या शिक्षकाच्या किळसवाण्या वृत्तीचे बिंग फुटले. त्यानंतर गावातील ग्रामस्थ आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेच्या दिशेने धाव घेतली. हे प्रकरण चिघळत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव आरोपी शिक्षकाला अटक करीत त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्या शिक्षकाचे नाव प्रमोद सरदार असून, त्याने आठवीत शिकणाऱ्या मुलींसोबत विनयभंगासारखा प्रकार केला असून, या प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळावरुन आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

















