भोरः राजगड ज्ञानपीठ संचलित अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या वतीने आरोग्यवर्धिनी स्वरूपा थोपटे यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी “स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पृथ्वीराज थोपटे (विश्वस्त राजगड ज्ञानपीठ भोर, उपाध्यक्ष अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट) यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाद्वारे करण्यात आले.
या उपक्रमामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असताना येत असणारी आव्हाने, स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, या आणि अशा विविध मुद्यांवर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपजिल्हाधिकारी पुनम अहिरे, भोर, वेल्हा कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर प्रसन्न कुमार देशमुख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष दुर्गा चोरगे, भोर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन बापू दामगुडे, भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र शेटे तसेच महाविद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. या उपक्रमास तालुक्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.