भोर: भोर तालुक्यातील सारोळा ते वीर या रस्त्याची दुरवस्था झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना प्रचंड अडचणी येत असून, अपघातांची संख्याही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, भोंगवली येथे स्थानिकांच्या वतीने सोमवारी दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
पुणे जिल्हा मधवर्ती बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे उपाध्यक्ष अजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. भोंगवली आणि राजापूर गावचे सरपंच अनुक्रमे अरुण पवार आणि बाळासाहेब बोबडे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
सारोळा, पांडे, राजापूर, भोंगवली, भांबवडे, सावरदरे आणि न्हावी या गावांतील ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी होणार आहेत. यापूर्वी, दि. २३ रोजी बांधकाम विभागास निवेदन देऊनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
रस्त्यावरील खड्डे बनले त्रासदायक:
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे टायर फुटत असून, छोटे-छोटे अपघात होत आहेत. याशिवाय, वाहनचालकांच्या पाठीला, मानेला आणि कमरेलाही त्रास होत आहे.
तहसीलदारांना निवेदन:
या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी. अन्यथा, ते आंदोलन तीव्र करण्यात येणार असून आंदोलनापूर्वी, आयोजकांनी तहसीलदारांना निवेदन देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.