शेतकरी बांधवांचा ,बळीराजाचा महत्त्वाचा सण म्हणजे बेंदुर बैलपोळा. हा बैल पोळ्याचा सण आज शुक्रवार (दि.१९) असल्याने भोरच्या बाजारात बैलांच्या साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी झाली आहे.
ग्रामीण भागात हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो .या दिवशी सालभर शेतात राबणा-या,कष्ट करणाऱ्या बैलांची मनोभावे पूजा केली जाते. बैलांची हौसमौज केली जाते.सकाळी बैलांना गरम पाण्याने अंघोळ घालण्यात येते नंतर त्यांना खाण्यासाठी भात, गोड पाणी दिले जाते .त्यांच्या अंगावर विशेष रंगीबेरंगी नक्षीची फुले, बैलांची नावे,चित्रे विविध रंगात काढली जातात. सामाजिक संदेश,जनजागृती करणारी दृश्येही अंगावर दाखवली जातात. शिंगाना रंग देऊन त्यावर चकमकी पट्टी लावली जाते. विविध रंगाचे फुगे, शेंब्या लावल्या जातात, शेपटींना रंगीबेरंगी फुगे बांधून डोक्याला नक्षीचे बाशींग ,पायात घुंगराचे तोडे , गळ्यात रंगीत मन्यांच्या माळा, घुंगराचे चाळ घातले जातात.अंगावर ऊबदार रेशीम मुलायम रंगीत झुल टाकली जाते.पुरण पोळीचा नैवेद्य खास बैलांना खाण्यासाठी दिला जातो. अलिकडील काळात बैलांच्या अंगावर आधुनिक पध्दतीने विद्युत रोषणाई देखील केली जाते.गावातील , शहरातील वेशी पासुन बैल जोड्यांची मिरवणूक काढली जाते.वर्षभर आपल्या धन्यासाठी राबणारा शंभू महादेवाचे वाहन असणारा बैल हा या दिवशी जणू तिन्ही जगताचा राजा म्हणून मिरवला जातो .
अशाच बैलजोड्या अधिकाधिक सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी भोर बाजारपेठ सजली आहे .शहरातील बाजार पेठेत बैलजोडी सजावटीचे साहित्य अनेक दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. बैलांसाठी हिंगूळ डबा, शिंगातील शेंब्या, बाशिंग, बेगड ,चाळ, कंबरपट्टा, धारकी ,मोरकी, अंगाचे कलर, झूल ,पैंजण,वेसण, घंटी,घुंगरू,चाळ , रंगीबेरंगी फुगे,फूले पूजनासाठी असे विविध प्रकारचे साहित्य व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी दुकानांमध्ये ठेवले आहे. बेंदूर सणादिवशी पूजनासाठी घरोघरी लागणारे मातीचे बैल बाजारपेठेत विक्रीसाठी मांडले गेले आहेत. छोटी बैल जोडी ५० रुपये तर मोठी बैलजोडी १०० , १५०,२०० रुपये पर्यंत विक्री केली जात आहे. बेंदूर आज असल्याने शेतकरी बैल सजावटीचे साहित्य घेण्यासाठी बाजारपेठेतील दुकानांमध्ये शेतकरी येऊ लागले आहेत.