खंडाळा : घर खरेदीदारांच्या हिताचे संरक्षण आणि बांधकाम क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी महारेरा (MahaRERA) प्रशासनाने मोठी कारवाई करत सातारा जिल्ह्यातील अनेक गृहप्रकल्पांची नोंदणी ‘लॅप्स’ (कालबाह्य) घोषित केली आहे. या कारवाईचा सर्वाधिक फटका खंडाळा परिसरातील अनेक नामांकित प्रकल्पांना बसला असून बांधकाम व्यावसायिकांसह गुंतवणूकदारांमध्येही खळबळ उडाली आहे.
महारेराने जाहीर केलेल्या यादीत खंडाळा तालुक्यातील अनेक मोठ्या निवासी प्रकल्पांचा समावेश आहे. यामध्ये मिलिंद देशपांडे यांचा आनंदराज्यम फेज-१, अलायन्स वनश्री व्हेंचर्सचा वूडविंड्स फेज-१, सोनारी डेव्हलपर्सचे नक्षत्र सिटी-१ आणि नक्षत्र सिटी-२, एस. के. डेव्हलपर्सची पारिजात रेसिडेन्सी, तसेच अरिष्ण, धनलक्ष्मी रेसिडेन्सी, लेक पॅलेस आणि चैतन्य प्रथमेश या प्रकल्पांचा समावेश आहे.
महारेराच्या माहितीनुसार, संबंधित विकासकांनी नियोजित मुदतीत प्रकल्प पूर्ण केले नाहीत. तसेच काम पूर्ण होण्यास विलंब होत असतानाही नियमानुसार मुदतवाढीसाठी अर्ज करण्यात आला नाही. याशिवाय प्रकल्पांच्या कामाचा आणि आर्थिक व्यवहारांचा तपशील देणारे तिमाही प्रगती अहवाल (QPR) देखील नियमितपणे सादर करण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे महारेराने कठोर भूमिका घेत संबंधित प्रकल्पांची नोंदणी लॅप्स घोषित केली.
या निर्णयामुळे खंडाळा परिसरात घर बुक केलेल्या ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ग्राहकांनी आपल्या आयुष्यभराच्या बचतीतून या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली असून आता प्रकल्पांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, ‘लॅप्स’ घोषित झाल्याने ग्राहकांचे अधिकार संपत नाहीत. उलट विकासकांवर नियमानुसार कारवाई करण्याचा मार्ग अधिक मोकळा होतो.
दरम्यान, फलटण, सातारा, वाई आणि कराडमधील अनेक प्रकल्पांनाही महारेराने दणका दिल्याने संपूर्ण जिल्ह्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून बांधकाम व्यावसायिकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचा स्पष्ट संदेश मिळाला आहे.










