भोर : तालुक्यातील विसगाव खोऱ्यातील वरवडी (वरेगाव) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ उघडे रोहित्र असल्याने शाळकरी मुलांच्या जीवाला सतत धोका निर्माण झाला आहे. रोज विद्यार्थ्यांना या धोकादायक रोहित्राशेजारून जावे लागत असल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शाळेपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर असलेले हे रोहित्र अगदी शेजारीच असल्याने लहान मुलं खेळता-खेळता किंवा अनावधानाने यास स्पर्श करतील, अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यातच रोहित्राशेजारी बांधलेली मुतारी व खांबावरील तुटक्या तारांमधून येणारे स्पार्किंग यामुळे दुर्घटनेचा धोका अधिकच वाढला आहे. “एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच महावितरण हलणार का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
स्थानिकांच्या मते, वारंवार तक्रारी करूनसुद्धा महावितरणने अद्याप योग्य ती उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे रोहित्रावर मजबूत झाकण कायमस्वरूपी बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या संदर्भात महावितरणचे सहाय्यक अभियंता टी.एल. गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “रोहित्रावर मजबूत झाकण आहे; काही वेळा स्थानिकच ते उघडून ठेवतात. मात्र आता कोणताही अनर्थ टाळण्यासाठी झाकण कायमस्वरूपी पॅकबंद करण्यात येईल,” अशी हमी दिली.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, सतत व्यक्त होत असलेली भीती व धोका लक्षात घेऊन प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा एखादा जीवघेणा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी महावितरणवर टाकण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.