नागरिक हैराण ; प्रशासन हतबल,व नियोजन शून्य कारभाराने नागरीक संतप्त
भोर – तालुक्यात सध्या घाटमाथ्यावर होत असलेल्या मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टीने भाटघर धरणात सद्य स्थितीला ९६ टक्के पाणीसाठा असूनही भोर शहरात मागील काही महिन्यांपासून दिवसाआड आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तसेच शहरात वीजेचा लपंडाव सुरू असुन शहरातील नागरिक मूलभूत सुविधा पाणी आणि वीज याबाबत प्रचंड संतप्त झाले आहेत. नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जून महिन्यात सुरूवातीला भाटघर धरणात केवळ ८ टक्के पाणीसाठा होता. त्यावेळी नगरपालिका प्रशासनाने कमी पाणीसाठ्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. आता धरणात ९६ टक्के पाणी असूनही हीच परिस्थिती कायम आहे. वीज खंडित झाल्यास पंप बंद पडतात, वीजेचे कारण देऊन पाणी येत नाही काही वेळा दोन-दोन दिवस पाणी मिळत नाही. यामुळे नागरिकांमध्ये विशेष करून महिलां मध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
भाटघर धरणाच्या भिंतीखाली असलेल्या विहिरीतून शहराला पाणीपुरवठा केला जातो. धरणातून चारीद्वारे विहिरीत पाणी आणले जाते, पण धरणातील पाणीसाठा कमी असल्यास विहिरीत पुरेसे पाणी येत नाही. शिवाय, धरणावरील वीजनिर्मिती केंद्र बंद असल्याने पाण्याचा प्रवाह मंदावला आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ९० एचपी आणि ६० एचपी क्षमतेचे प्रत्येकी दोन पंप आहेत, पण अपुरा पाणीपुरवठा आणि कमी दाब यामुळे नागरिकांना स्वच्छ पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
दरवर्षी जैसे थे ,आहे तीच परिस्थिती कायम.
दरवर्षी मे महिन्यात भाटघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने भोर शहरात पाणीटंचाई निर्माण होते. यावर भोर नगरपालिकेकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जाते. कोणत्याही ठोस उपाययोजना नसल्याने ही समस्या कायम आहे. १३ कोटी रुपये खर्चून नवीन नळपाणी पुरवठा योजना राबवली गेली, पण वीजनिर्मिती केंद्र बंद असल्याने विहिरीत पाणी कमी पडते. यामुळे ही योजना अपुरी ठरत आहे तसेच स्थानिक आजी माजी नगरसेवकही प्रशासक असल्यामुळे मौन बाळगून गप्प आहेत.
१८ लाखांचा खर्च, तरीही अपुरा पाणीपुरवठा
भोर नगरपालिका प्रशासन दरवर्षी पाटबंधारे विभागाला लाखो रुपये देते, पण तरीही नियमित पाणीपुरवठा होत नाही. यावर उपाय म्हणून भोर शहर शिवसेना प्रमुख नितीन सोनावले यांनी थेट धरणात वीजपंप टाकून पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. यामुळे पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी सुटेल, असा त्यांनी दावा केला आहे.
बारा महिने अठराकाळ वीजेचा लपंडाव सुरूच
भोर तालुक्यासह शहरात वीजेचा लपंडाव सुरू असुन लाईट जाणे ही नित्याचीच बाब झाली आहे.तालुक्यात दोन दोन धरणे नुसती म्हणायला असुन वीजेबाबत लोकांच्या अनेक समस्या जाणवू लागल्या आहेत.दररोज दुरुस्तीच्या नावाखाली दररोज दोन तीन तास वीज खंडित होत आहे तर शहरात अनेक भागात रात्रभर वीज नसणे या वीजेच्या लपंडावने नागरिक हैराण झाले आहेत.वीज बीलात मात्र कोणताच बदल नसून लाईट असली तेवढेच बील नसली तरी तेवढेच बील येत आहे