शैक्षणिक साहित्यांचे विद्यार्थ्यांना वाटप
भोर – रायरेश्वरच्या पायथ्याला असलेल्या टिटेघर (ता.भोर) येथील ध्रुव प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात असतात. असाच आज मंगळवार (दि.११) एक सामाजिक उपक्रम इयत्ता बारावीची परीक्षा चालू होत असल्याने शिवाजी विद्यालय व जुनिअर कॉलेज भोर येथे संस्थेच्या विद्यालयात राबविण्यात आला. इयत्ता बारावी परीक्षार्थींना भोर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार, प्राचार्य मारुती शेरखाने, पोलीस कॉन्स्टेबल अभय बर्गे शिक्षक ,संतोष घोरपडे, ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर यांच्या हस्ते गुलाब पुष्प व शैक्षणिक परीक्षा साहित्य देऊन स्वागत व परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
इयत्ता बारावीची परीक्षा देण्यासाठी भोर येथील परीक्षा केंद्रावर दुर्गम डोंगरी परीक्षार्थी येत असतात कधी कधी विद्यार्थ्यांची अचानक पेन मधील शाही संपते ,किंवा विद्यार्थी परीक्षेचे साहित्य चुकून विसरून येतात. अशी अडचण होऊ नये म्हणून अडचण निर्माण झाल्यावर संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून परीक्षेसाठी उपयुक्त साहित्य परीक्षा केंद्रावर ध्रुव प्रतिष्ठान च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले. ध्रुव प्रतिष्ठानच्या या अशा उपक्रमामुळे परीक्षा साहित्याची अडचण निर्माण होणार नसल्याने पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार व प्राचार्य मारुती शेरखाने यांनी स्वागत केले आहे. तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला . भोर मधील सर्व परीक्षा केंद्रावर असे साहित्य उपलब्ध करून ठेवले जाणार असल्याचे ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर यांनी सांगितले. शिवाजी विद्यालय व जुनिअर कॉलेजच्या वतीने पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांचे व परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.