भोर – शहरात हाकेच्या अंतरावर भोर- शिरवळ मार्गावरील रामबाग परिसरातील न्यू बालाजी सुपर मार्केट किराणा मालाच्या दुकानाला आज रविवार (दि.९ ) अचानक आग लागून दुकान संपूर्णतः भस्मसात झाल्याची घटना घडली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने सुपर मार्केटच्या शेजारील टिशू पेपर दुकान, चहा नाष्टाचे हॉटेल, मोबाईल शॉपी यांचेही आगीत मोठे नुकसान झाले आहे. न्यू बालाजी सुपर मार्केट या दुकानाला अचानक आग लागल्याचे शेजारील दुकानदाराच्या लक्षात आल्याने दुकानदाराने स्थानिकांना सांगितले. स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने तात्काळ भोर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले . आग विझवताना आगीच्या लोटातून तेल डब्बे तसेच शीतपेयाच्या बाटल्यांचे स्फोट होऊ लागल्याने फटाक्यांसारखे मोठे आवाज होऊ लागले होते. त्यामुळे काही काळ स्थानिकांना आग विझवण्याससाठी अडथळा निर्माण झाला होता. अग्निशमन दल ,भोर पोलीस प्रशासन तसेच स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून आग विझवण्याचा प्रयत्न केला.अखेर एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
या घटनेत न्यु बालाजी सुपर मार्केटचे होलसेल व्यापारी भूषण गावडे (शिरवळ) यांचे ३० लाखाचा किराणामाल तर ३ लाख ५० हजारांची रोखड आगीत भस्मसात झाली. टिशू पेपर दुकानदार सोहम पवार (भोर) यांचे २ लाख, ओंबळे अमृततुल्य हॉटेल मालक नवनाथ ओंबळे (वाकांबे )१ लाख ,तर मोबाईल शॉपीच्या निखिल तळेकर (उत्रौली) यांचे ५० हजारांच्या साहित्याचे आगीत जळून नुकसान झाले. भोर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आगीत जळालेले दुकानांचा पंचनामा केला. नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र आगीचे नेमके कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही.