डी वाय एस पी तानाजी बर्डे, प्रांताधिकारी डॉ विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सामने
भोर – भोर तालुक्यावर प्रशासनाची नेहमीच वचक राहिली आहे सततच्या नियोजित व्यस्त कामातुन एक दिवस खेळासाठी आयोजित करत प्रशासनाकडून क्रिडा महोत्सव २०२५ साजरा करत भोर प्रशासन चषक २०२५ चे आयोजन शनिवार (दि २५ ) भोरमधील राजा रघुनाथराव विद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते. या सामन्यांचे उद्घाटन प्रांताधिकारी डॉ विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच खास आवर्जून प्रमुख उपस्थिती डी वाय एस पी तानाजी बर्डे यांची लाभली, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे , पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार, नगरपालिका मुख्याधिकारी गजानन शिंदे, तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी, एसटी आगार व्यवस्थापक रमेश मंथा, वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत , तालुक्यातील सर्व पत्रकार असे प्रशासनातील मुख्य अधिका-यांचे सहकार्य लाभले.
प्रशासनातुन एकुण आठ संघ देण्यात आले होते. यामध्ये तहसीलदार -प्रांत महसूल विभागाकडून राजगड रिव्ह्यन्यू वॉरियर्स, नगरपालिकेकडुन नगर विकास प्रशासन म्हणून भोरेश्वर अर्बन वॉरियर्स, पंचायत समिती विभागाकडून रायरेश्वर डेव्हलपमेंट वॉरियर्स, वनविभागाकडून फॉरेस्ट फायटर्स, पोलीस प्रशासनाकडून सिंहगड खाकी नाईटस, एसटी आगार विभागाकडून स्टेट ट्रान्सपोर्ट क्रूझर्स, कृषी विभागाकडून कृषीराज किंग्ज , आणि भोर तालुक्यातील सर्व पत्रकारांमार्फत पत्रकार पलटण असे आठ संघ देण्यात आले होते. यामध्ये साखळी पध्दतीने खेळवल्या गेलेल्या सामन्यातुन नगर विकास प्रशासन भोरेश्वर अर्बन वॉरियर्स व वनविभाग फॉरेस्ट फायटर्स असे दोन संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. यामध्ये फॉरेस्ट फायटर्स हे अंतिम सामन्यात विजयी झाले तर नगरपालिका नगर विकास प्रशासन उपविजेते ठरले. अंतिम सामन्यात फॉरेस्ट फायटर्स विजेता संघाचा सामनावीर ठरला अभिजित शिवतरे ,तर या चषकाचा मालिकावीर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे ठरले, चषकातील उत्कृष्ट फलंदाज म्हणून ग्रामविकास अधिकारी पद्माकर डोंबाळे , उत्कृष्ट गोलंदाज पंचायत समिती कृषी विभागाचे विजय कोळी, तर अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून वनविभागाचे वैभव कंक यांना गौरविण्यात आले. प्रशासनाकडून झालेल्या क्रिकेटच्या सामन्यांची रंगत, मौजमजा हौस सर्व विभागातील अधिकारी यांनी अनुभवली. तसेच महिलांचेही क्रिकेट, हॉलीबॉल , रस्सीखेच हे सामने याठिकाणी पार पडले. यामुळेही या क्रिडा महोत्सवाला मोठी रंगत आली.व प्रशासनातील सर्वांनी याचा पुरेपूर आनंद घेतला.