महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीचे सहकार्य
भोर- तालुक्यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करत असलेली ध्रुव प्रतिष्ठान ही संस्था तालुक्यातील नागरिकांच्या विविध गरजा ओळखून अनेक उपक्रम राबवत आहे .गेले अनेक वर्ष संस्था महिला सबलीकरण, आरोग्य, शिक्षण, व ग्रामविकास , बालविकास यामध्ये उल्लेखनीय काम करत आले आहे.असाच एक महत्त्वकांक्षी उपक्रम दुर्गम भागातील शाळांमध्ये सध्या राबवला जात आहे. तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांची वीज उपयुक्तता, वारंवार विजेची येणारी समस्या, लाईट बिलांची होणारी परवड ,येणारी समस्या यावर कायमस्वरूपी पर्याय काढण्यासाठी ध्रुव प्रतिष्ठान ही संस्था महाराष्ट्र राज्य विद्युत महापारेषण कंपनीच्या सहकार्याने वीस लाख रुपये खर्चून दुर्गम डोंगरी भागातील मोठ्या सौरउर्जेद्वारे शाळांची विजेची समस्या मिटवणार असल्याचे ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर यांनी सांगितले.
शाळांना गरजेनुसार दोन किंवा तीन केवीचे सौर पॅनल सिस्टीम, इन्वर्टर बॅटरी बॅकअप बसविण्यात येणार असून यामुळे विज गेले तरी विजेची समस्या भेडसावणार नाही. तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोर्ले, वडतुंबी, टीटेघर, धोंडेवाडी ( चिखलगाव ), कर्नावड, रायरेश्वर माध्यमिक विद्यालय टिटेघर या शाळांना याचा लाभ मिळणार असून पुढील काही दिवसात टप्प्याटप्प्याने बाकी शाळांनाही लाभ देण्यात येणार आहे. संस्थेने मागील वर्षी महापारेषण कंपनीच्या मदतीने 30 संगणकांचे वाटप केले होते असेही केळकर यांच्याकडून सांगण्यात आले.
शाळा वीज मुक्त होणार असून वीज बिलांचा प्रश्न कायमचा मिटणार असून सातत्यपूर्ण विजेचा पुरवठा यामुळे शाळांची गुणवत्ता वाढीस एक प्रकारची मोठी मदत होणार आहे.
” अंजना वाडकर – केंद्रप्रमुख केंद्र कर्नावड(ता.भोर)“