भोर: येथील राजगड ज्ञानपीठाच्या न्यू इंग्लिश स्कूल संगमनेर येथील शैक्षणिक वर्ष १९९२ सोलापूर दहावीमधील माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा आयोजित केला होता. तब्बल ३२ वर्षांनी एकत्र भेटलेले माजी विद्यार्थी आपल्या शाळेतील जुन्या आठवणीत रमले होते. मा. विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींची उजळणी यावेळी केली. विद्यालयातील मा. विद्यार्थी संदीप धुमाळ, प्रसाद वीर, संतोष गोरड, रमेश बांदल, रामदास भडाळे, गोरक्ष गोरड व सुनील धुमाळ यांच्या प्रयत्नामुळे या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या स्नहेमेळाव्याचे दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांचा सन्मान केला. यावेळी माजी मुख्याध्यापक बाळासाहेब नवले, गिरीश भुतकर, लक्ष्मण वराळे, रमेश बुडगुडे, विश्वास लोखंडे, आदिनाथ जगताप, सुभाष शिंदे व साहेबराव बोरकर आदींचा सन्मान करण्यात आला. माजी विद्यार्थी आयोजित करीत असलेल्या सेवा मेळाव्याच्या शुभेच्छांमुळे आम्हाला जगण्यासाठी ऊर्जा मिळत असल्याचे मत न्यू इंग्लिश स्कूल संगमनेर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बाळासाहेब नवले यांनी व्यक्त केले.
शिक्षकांनी केलेल्या संस्कारामुळे आम्ही ताठ मानेने उभे असल्याचे मत माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. त्यामुळे शिक्षकही भावुक झाले होते. विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या आत्ताच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्यासाठी विशेष उपक्रम राबविणार असल्याचे माजी विद्यार्थ्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक शेलार व प्रदीप कुंभार यांनी केले.