भोरः राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीची त्सुनामी आली अन् एक्सिट पोलने केलेला अंदाज पुन्हा एकदा सपशेल फोल ठरला. महायुतीला राज्यात घवघवीत यश मिळाले तर प्रतिस्पर्धी असणाऱ्या आघाडीच्या उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर महायुतीच्या उमेदवारांना यश मिळाले आघाडीतील अनेक नेत्यांनी ईव्हीएम मशिनवर पुन्हा एकदा शंका उपस्थित केली आहे. भोर विधानसभा निवडणुकीत मा. आमदार संग्राम थोपटे यांना पराभव वाट्याला आला पण त्यांनी मतदार संघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने काम करण्याचा निर्धार केला आहे. तसेच विधानसभेची निवडणूक होती की ईव्हीएम मशिनचे षडयंत्र? असा सवाद देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
जनतेसाठी पूर्ण वेळ देणारः थोपटे
भोर येथील रायरेश्वर डोंगरी विकास कार्यालयात मा. आमदार संग्राम थोपटे यांच्या भेटीगाठीसाठी आलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशी निवडणूक निकालाविषयी थोपटे यांनी चर्चा केली. याप्रसंगी भोर, वेल्हा, मुळशीतील हजारो कार्यकर्ते मा. आमदार संग्राम थोपटे यांना भेटण्यासाठी उपस्थित होते. थोपटे म्हणाले की, निकालाच्या दुसऱ्या दिवशी जनतेचे काम करण्यास सुरुवात केली आहे. पुढील काळात निरंतर जनतेसाठी लढत राहणार आहे. पराभव झाला असला, तरी खचणार नाही. जनतेसाठी पूर्णवेळ देणार आहे, असल्याचे ते यावेळी म्हणाले.