जेजुरीः सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहात दि. ११ व १२ नोव्हेंबर असे दोन दिवसीय पुरंदर विधानसभा मतदार संघासाठी मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. पहिल्या दिवशी दोन सत्रात पशिक्षण घेण्यात आले, तर दुसऱ्या दिवशी एका सत्रात पशिक्षण पार पडले. येथे चौकशी कक्ष, वैद्यकीय मदत कक्ष, टपाली मतदान कक्ष तसेच प्रत्यक्ष ईव्हीएम मशीन हाताळणी, १८ विविध कक्षांची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये 18 ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या होत्या व अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष ईव्हीएम मशीन हाताळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.
या प्रशिक्षण कार्यक्रमात पुरंदर विधानसभेचे मुख्य निवडणूक निरीक्षक नसीम खान, निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के, निवडणूक नायब तहसीलदा गोंजारी, प्रशिक्षण समन्वयक वाघ व मतदान अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मतदार प्रक्रिया सुरळीत होण्याकरिता पुरंदर विधानसभा मतदार संघांमध्ये मतदान केंद्रावरील कामकाजासाठी एकूण 2145 कर्मचाऱ्यांचा समावेश असून, पुरंदर विधानसभा मतदार संघामधील एकूण 418 मतदान केंद्राकरिता विविध कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्रअध्यक्ष, मतदान अधिकारी १, मतदान अधिकारी २, मतदान अधिकारी ३, अशा एकूण पाच कर्मचाऱ्यांच्या विविध 418 टीम्स तयार करण्यात आलेल्या आहेत.
मतदान साहित्य वाटपाच्या दिवशी घ्यावयाची काळजी जसे की, मतदान साहित्य प्राप्त झाल्यानंतर तपासून घेणे व मतदान केंद्रावर गेल्यावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची जोडताना घेण्याची खबरदारी, मॉक पोल घेणे तसेच मतदान पार पडल्यानंतर मशीन पुन्हा जमा करणे इत्यादी संदर्भात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन देण्यात आले. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणालाही स्मार्टघड्याळ, सेल फोन, कॉर्ड लेस फोन, वायर लेस संच वापरण्यास परवानगी नाही. तसेच निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्याची आव्हान करण्यात करण्यात आले. पुरंदर विधानसभा मतदार संघांमधील अधिकारी, कर्मचारी यांची प्रशिक्षण घेण्यात आले आहे व आम्ही येणारी निवडणूक पार पडण्याकरिता सज्ज आहोत, असे निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी सांगितले.